Wed, Jul 15, 2020 23:05होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : आत्‍महत्येसाठी जाताना अपघाती मृत्यू

औरंगाबाद : आत्‍महत्येसाठी जाताना अपघाती मृत्यू

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:58AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

मृत्यू ठरवून येत नाही, तो केव्हा आणि कसा येईल याचा काही नेम नाही, याची प्रचिती सोमवारी औरंगाबादेत आली. कर्जबारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी जाणार्‍या बिल्डरची भरधाव कार कंटेनरला धडकल्यामुळे रस्त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धावलेल्या फुलंब्री पोलिसांना बिल्डरच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हा प्रकार समोर आला. केंब्रिज चौक-सावंगी बायपासवर सोमवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता ही घटना घडली. आत्महत्येसाठी निघालेल्या या बिल्डरने अचानक स्वत:च आपली कार कंटेनरवर घालून आत्महत्या केली असावी, असा संशय ‘त्या’ सुसाईड नोटमुळे पोलिसांनी व्यक्त केला आहे.  

फहीम खान रशीद खान (36, रा. लतीफनगर, देवळाई) असे मृत बिल्डरचे नाव आहे. त्यांची एम. के. कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम कंपनी आहे. शहराच्या आसपास विविध ठिकाणी त्यांच्या साईट सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फहीम खान हे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडले. ते कारने (क्र. एमएच 20 बीजी 2020) देवळाई भागातून केंब्रिज चौकामार्गे सावंगी बायपासने जात होते. त्याच वेळी समोरून येणार्‍या कंटेनरने (क्र. एमएच 06 एक्यू 6303) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. तर, कंटेनरचाही समोरचा भाग पूर्णपणे फुटला. तसेच, फहीम खान हे जागीच ठार झाले. 

अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी फहीम खान यांना कारमधून बाहेर काढून लगेचच घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळाल्यावर फुलंब्री पोलिस घटनास्थळी धावले. हवालदार जे.बी. मुरमे यांनी घाटीत येऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणी फुलंब्री ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

फहीम खान यांची बांधकाम कंपनी आहे. नोटा बंदीचा निर्णय झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय प्रचंड तोट्यात गेला. अनेक प्रयत्न करूनही कंपनी नफ्यात आली नाही. त्यामुळे व्यवसायासाठी कर्ज घेतले. यापैकी महेश तरटे याच्याकडून पैसे घेण्यात आले होते. त्याच्या पैशांची परतफेडही करण्यात आली होती. मात्र, त्याने आणखी तगादा लावला होता. तसेच, तो कार्यालयात येऊन त्रास देत होता. घरी येऊन धिंगाणा घालण्याची धमकी दिली होती. त्याच्या त्रासाला कंटाळूनच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख फहीम खान यांच्या सुसाईड नोट मध्ये आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

फहीम खान यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी खाशीमची माफी मागितली. तसेच, घरातून बाहेर पडण्यापूर्वी मुलगी पलक उठलेली नव्हती. त्यामुळे तिच्याकडे पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. तिला न उठवताच ते घराबाहेर पडलो. शिवाय मम्मीला त्रास देऊ नको, असा सल्ला त्यांनी मुलीला दिला असून कार विक्री करून कर्ज फेड, असे पत्नीला म्हटले आहे.