Sun, Mar 24, 2019 11:06होमपेज › Aurangabad › चॉकलेट आणण्यासाठी गेला अन् चुकला

चॉकलेट आणण्यासाठी गेला अन् चुकला

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 1:07AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

पडेगाव (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथून लग्न सोहळ्यासाठी मामाच्या घरी जयभवानीनगर येथे आलेला 7 वर्षीय साहिल चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेला; परंतु माघारी परतताना तो रस्ता चुकला अन् दुसर्‍याच गल्लीत घुसला. मामाचे घर सापडत नसल्यामुळे तो धाय मोकलून रडू लागला. हा प्रकार या भागातील विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) यांच्या लक्षात आला. त्यांनी मुकुंदवाडी ठाण्यात नोंद करून प्रत्येक गल्लीत फिरून साहिलला मामाचे घर शोधून देण्यास मदत केली.

साहिल चंद्रकात लाड (7 वर्षे) असे मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल आई मनीषा यांच्यासोबत मामाच्या घरी आलेला आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता तो चॉकलेट आणतो म्हणून बाहेर पडला. एका दुकानात जाऊन त्याने चॉकटले घेतले; परंतु घरी परतताना तो रस्ता चुकला. दुसर्‍याच गल्लीत भटकत राहिला. काही वेळानंतर घर सापडत नसल्यामुळे त्याला रडू कोसळले. ही कामगिरी विशेष पोलिस अधिकारी गोवर्धन उगले, विजय गांगे, विजय पवार, दिलीप डुकरे आदींनी केली. 

रस्त्यावर रडताना त्याला विशेष पोलिस अधिकार्‍यांनी पाहिले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने नाव, गाव, वय सांगितले; परंतु त्याला जयभवानीनगरचा पत्ता काही सांगता आला नाही. अखेर एसपीओंनी त्याला ठाण्यात नेले. त्याची नोंद केली. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनीही उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांच्यासह पोलिसांचे एक पथक व एसपीओ यांना शोध घेण्यास सांगितले. अखेर, साहिलच्या मामाचे नाव समजल्यावर त्यांना व आईला ठाण्यात बोलावून घेत साहिलला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.