औरंगाबाद : प्रतिनिधी
भेटायला का येत नाही म्हणून तरुणाने ओळखीच्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, तरुणीसह तिच्या चुलत बहिणीच्या मोबाइलवर सतत फोन करून त्रास दिला. या प्रकरणी 17 जानेवारी रोजी जवाहरनगर ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली. महेश नाटेकर (रा. राजा बाजार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुण महेश याची गारखेडा भागातील 21 वर्षीय तरुणीशी जुनी ओळख आहे. त्यादरम्यान त्याने तरुणीचे काही फोटो काढून ठेवले होते. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे तरुणी त्याला भेटायचे टाळत होती. नंतर भेटायला का येत नाही म्हणून जुने फोटो वडिलांच्या मोबाइलवर पाठविण्याची धमकी महेशने तरुणीला दिली. तसेच, तेच फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने मोबाइल बंद करून ठेवला. परंतु, आरोपी महेशने तिचा पिच्छा सोडलाच नाही. तरुणीच्या चुलत बहिणीचा क्रमांक मिळवून त्याने पुन्हा तिला त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर, त्याचा त्रास वाढल्याने या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून महेश नाटेकर याच्याविरुद्ध छेड काढली म्हणून जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी आरोपी महेश नाटेकर याला अटक केली असून जामीनपात्र गुन्हा असल्याने त्याला समज देऊन जामिनावर मुक्त केले.