Wed, Apr 24, 2019 00:19होमपेज › Aurangabad › चौकशी आदेश देऊनही कारवाई शून्य

चौकशी आदेश देऊनही कारवाई शून्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील बोरसर गावामधील घरकूल योजनेच्या 58 लाभार्थ्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी विभागीय आयुक्‍त आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) अधिकार्‍यांनीही गटविकास अधिकार्‍यांना तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, मुजोर अधिकारी विभागीय आयुक्‍त आणि डीआरडीएच्या आदेशालाही जुमानायला तयार नसल्याचे दिसते. अद्याप चौकशीसाठी गावात एकही अधिकारी फिरकला नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

‘आम्ही वंचित लाभार्थी.. घरकूल योजनेचे’, या मथळ्याखाली दै. पुढारीने बुधवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले. यानंतर वरिष्ठ पातळीवर प्रशासनाने दखल घेऊन लाभार्थ्यांवर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्‍तांपाठोपाठ डीआरडीएच्या अधिकार्‍यांनीही वैजापूर पंचायत समितीच्या बीडीओंना पत्राद्वारे निर्देश दिले. मात्र, निर्ढावलेले अधिकारी विभागीय आयुक्‍त, डीआरडीएच्या आदेशांनाही जुमानायला तयार नाहीत. आयुक्‍तांनी 17, तर डीआरडीएने 22 नोव्हेंबर रोजी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु अद्याप अधिकार्‍यांनी बोरसर गावात पाऊलही ठेवलेले नाही. त्यामुळे दोषी अधिकार्‍यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गावकर्‍यांकडून होत आहे.