औरंगाबाद : प्रतिनिधी
फेरफार प्रकरणात असलेल्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निलंबित केलेले, या निलंबन आदेशाला विभागीय आयुक्तांकडून अवघ्या काही दिवसांतच स्थगिती आणणारे कांचनवाडीचे मंडळ अधिकारी राजेंद्र बागडे यांना नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिल्लोडची वाट दाखवली आहे. सिल्लोड तहसील कार्यालयात संजय गांधी योजनेतील अव्वल कारकूनपदी बागडे यांना बसवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुरुवातीला बदल्या न करण्याची भूमिका घेतली होती. नवल किशोर राम यांनी बसवलेली जिल्हा प्रशासनाची घडी आहे तशीच राहावी, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. बदल्या केल्यास येणारा नवीन कर्मचारी संबंधित टेबलवरील कामकाज समजून घेण्यास वेळ घेतो, त्यामुळे अनेकदा प्रशासकीय कामांचा खोळंबा होता, असे चौधरी यांचे मत होते. मात्र संघटनांच्या दबावामुळे अखेर बदलीस ते राजी झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बदल्यांचा खेळ रंगला होता. पहाटे तीन वाजेपर्यंत आस्थापना विभागातील अधिकारी कर्मचारी बदल्यांचे आदेश काढण्यात गुंतलेले होते.
राम यांनी केलेल्या निलंबन कारवाईविरोधात विभागीय आयुक्तांकडे बागडेंनी केलेल्या अपीलावर सुनावणी पूर्ण झालेली असून, त्या संदर्भात लवकरच आदेश निघणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर बागडेंची बदली सिल्लोडला झाली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरगेमागील ‘शनी’ कोण?
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे यांची बदली गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे मंडळ अधिकारीपदी केली होती. या बदलीमागे डॉ. पांडेय यांचा विश्वास संपादन केलेल्या ‘शनी’चा हात असल्याची चर्चा होती. मात्र यंदा त्यांची वर्णी शहर परिसरात होईल, अशी चिन्हे होती, मात्र वाळूजहून त्यांना सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकूनपदी बदली देण्यात आली आहे. त्यामुळे गिरगेंवरील ‘शनी’ची वक्रदृष्टी अजूनही कायम असल्याची चर्चा आहे.