Thu, Nov 15, 2018 07:23होमपेज › Aurangabad › भाडेकरूंनी विकली कोट्यवधींची जागा

भाडेकरूंनी विकली कोट्यवधींची जागा

Published On: Feb 10 2018 1:27AM | Last Updated: Feb 10 2018 1:05AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या जाधवमंडी, बांबू मार्केटमधील 22 हजार स्न्वे. फूट जागा 99 वर्षांच्या भाडेकरारावर घेऊन ती परस्पर विक्री केली. विशेष म्हणजे, भाडेकरूंनीच एका राजकीय नेत्याच्या पुतण्याला या जागेचा जीपीए करून दिला. पुढे त्यानेही मनपाला परस्पर हक्कसोड प्रमाणपत्र देऊन कोट्यवधींची जागा बळकावल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 8) सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून त्यातील दोघे मृत आहेत. 

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पुतण्या इंद्रजित पंडितराव थोरात (46, रा. सुदर्शननगर, बन्सीलालनगर), माजी नगरसेवक किशोर बाबूलाल तुळशीबागवाले (रा. सिटी चौक) यांच्यासह भाडेकरू लालदास पन्नालाल शहा (रा. बांबू मार्केट, जाधवमंडी), अशोक नगीनदास शहा (रा. सिटी चौक) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुषार दिगंबर रावळ (44, रा. बांबू मार्केट) यांची जाधवमंडी, बांबू मार्केट भागात सिटी सर्व्हे क्र. 7979 व 7986 ही 22 हजार स्न्वे. फूट जागा आहे. ती जागा 1 मार्च 1968 रोजी तुषार यांचे वडील दिगंबर रावळ यांनी नगीनदास पन्नालाल शहा (सध्या मृत), रमणलाल पन्नालाल शहा (सध्या मृत) आणि लालदास पन्नालाल शहा (87, रा. बांबू मार्केट, जाधवमंडी) यांना 99 वर्षांच्या भाडेकरारावर दिली होती. 23 फेब्रुवारी 1998 रोजी या तिघांनी संगनमत करून सिटी सर्व्हे क्र. 7986 मधील 169.00 चौरस मीटर जागा महापालिकेला परस्पर विकली. मुळात शहा हे भाडेकरू होते. अधिकार नसताना त्यांनी 12 लाख तीन हजार 871 रुपयांत ही जागा विक्री केली. विशेष म्हणजे, त्या खरेदीखतावर माजी नगरसेवक किशोर तुळशीबागवाले आणि अशोक नगीनदास शहा हे साक्षीदार आहेत. त्यांना या जागेचे मूळ मालक दिगंबर रावळ असल्याची माहिती होती, तरीही त्यांनी ही जागा परस्पर विक्री करण्यास हातभार लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.