Fri, Apr 19, 2019 12:30होमपेज › Aurangabad › भीमा कोरेगाव प्रकरण : पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अपयशी

भीमा कोरेगाव प्रकरण : पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अपयशी

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:54AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

सोमवारी सायंकाळी शहरात कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर मंगळवारी काय होऊ शकते? याची माहिती मिळविण्यात पोलिसांचा गुप्तचर विभाग कमी पडला. त्यामुळे शहर पोलिस यंत्रणा गाफील राहिली. नेमकी माहिती मिळाली नाही. नसता शहरात तीन दिवस तणाव निर्माण झाला नसता. याबाबत शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी आयुक्‍तालयात झालेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत विचारमंथन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीचे जे गुन्हे दाखल झाले, त्याचा तपास संबंधित ठाण्याचे निरीक्षकच करतील, परंतु सामायिक तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याचे आयुक्‍त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी (दि. 5) दुपारी पत्रकारांना सांगितले. यात उपायुक्‍त (मुख्यालय) डॉ. दीपाली धाटे-घाडगे या प्रमुख, तर सहायक पोलिस आयुक्‍त (गुन्हे) रामेश्‍वर थोरात आणि पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे हे त्यांना साहाय्य करतील. शहरात दंगलीच्या वेळी चिली ड्रोनचा वापर का झाला नाही या प्रश्नावर आयुक्‍त यादव म्हणाले, गणेशोत्सवामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनचे सादरीकरण केले होते. मात्र, शासनाकडून निधी मिळाला नसल्याने अजून खरेदी झालेली नाही. ई-टेंडरच्या माध्यमातून लवकरच खरेदी केली जाईल.  

कोणावरही अन्याय होणार नाही

दोन दिवसांत 74 जणांना अटक केली होती. गुरुवारी रात्री आणखी 28 जणांना अटक केली असून इतर आरोपींनाही लगेचच अटक केली जाईल. दगडफेक, जाळपोळीच्या वेळी घेण्यात आलेले शूटिंग, फोटो, मोबाइल क्लिपिंग, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आदी पुरावे तपासल्यानंतरच आरोपींना अटक करण्यात येईल. या गुन्ह्यात कोणत्याही निष्पाप नागरिकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी पोलिस घेतील.   - यशस्वी यादव, पोलिस आयुक्‍त

मास्टरमाइंडचा शोध सुरू

दगडफेक, जाळपोळ ही पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे यामागे कोणीतरी मास्टरमाइंड असल्याचाही पोलिसांनी दावा केला. त्याचा शोध सुरू केला असून अशी दहा नावे समोर आली आहेत. त्यांची चौकशी केली जाईल. याशिवाय दगडफेक करणार्‍या 200 जणांची ओळख पटली असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी सांगितले. 

नुकसान भरपाईची रक्‍कम वसूल करणार

आरोपींमधूनच माफीचा साक्षीदार निवडला जाईल. जो पोलिसांना सहकार्य करेल, त्याचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविला जाईल. तसेच, ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, त्या मालमत्ताधारकांनी कोर्टासमोर कलम 164 नुसार जबाब नोंदवावा, जेणेकरून त्यांची बाजू भक्‍कम होईल. झालेल्या नुकसान भरपाईची रक्‍कम दंगेखोरांकडूनच वसूल केली जाईल, असेही आयुक्‍त यादव म्हणाले. 

प्लास्टिक बुलेट्स पायावर का मारल्या नाही?

पोलिसांनी औरंगाबादेत दोन दिवसांत प्लास्टिक बुलेट्सचे 53 राउंड हवेत फायर केले. मुळात प्लास्टिक बुलेट्स हवेत मारायच्याच नसतात. त्या आंदोलकांच्या पायावर माराव्या लागतात. त्यामुळे व्यक्‍ती ठार होत नाही, केवळ जखमी होत असतो. त्यानंतर लाठीचार्ज करण्याची गरज पडत नसते. प्लास्टिक बुलेट्स हवेत फायर केल्यामुळे यादव यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. परंतु, दंगल नियंत्रक पथकाला लगेचच प्रशिक्षण दिले जाईल.