Fri, Apr 26, 2019 03:10होमपेज › Aurangabad › कचरा जाळणार्‍यांनो खबरदार..!

कचरा जाळणार्‍यांनो खबरदार..!

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 11:58PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरात 68 दिवसांपासून कचरा प्रश्‍न धुमसतोय. आता खरोखरच कचरा पेटला असून नागरिक दिसेल त्या ढिगार्‍याला आग लावत असल्याचे समोर आले आहे. शहरात 25 ठिकाणी कचरा जाळण्यात आला असून या प्रकरणात क्रांती चौक ठाण्यात एकाच दिवसात 6 गुन्ह्यांची नोंद झाली. या आगीमुळे शहरात प्रदूषण वाढले असून आग लावणार्‍याचा शोध घ्यावा, असे स्वच्छता निरीक्षक दानेश सिद्दीकी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, शहराच्या चौका-चौकांत कचर्‍याचा साचलेला ढिगारा पेटवून दिला जात आहे. महापालिकेचे कर्मचारी कचरा पेटवत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, आता मनपा कर्मचारी कचरा पेटवत नाहीत. या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन इतरांच्या मालमत्तेचे देखील नुकसान होऊ शकते. फेब्रुवारीपासून शहरातील कचर्‍याचा प्रश्न पेटलेला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचर्‍याचा ढिगारा पेटवून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, या प्रकारामुळे गेल्या महिन्यात आगीच्या दोन गंभीर घटना घडल्या होत्या. शहागंज भागात लागलेल्या आगीमध्ये कार जळून खाक झाली होती. तर मोंढ्यातील बारदाण्याच्या गोडावूनला आग लागली होती. 

विशेष म्हणजे, हा कचरा मनपा कर्मचार्‍यांनीच पेटविला होता, हे सीसीटीव्ही फुटेजवरून समोरही आले होते. आतापर्यंत सुमारे दीडशे ठिकाणी आग लावण्यात आल्याची नोंद अग्निशमन दलाकडे करण्यात आली आहे. याशिवाय शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा भागासह इतर 25 ठिकाणी कचरा पेटवण्यात आला होता. या सर्व घटनांच्या अनुषंगाने स्वच्छता निरीक्षक सिद्दीकी यांनी सहा तक्रारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात नोंदवल्या आहेत. महानगरपालिका कचरा पेटवत नसल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे. तर कचरा पेटविणार्‍याचा पोलिसांनी शोध घ्यावा असेही नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Tags : Aurangabad, Beware, garbage, fire