Thu, Jun 20, 2019 14:55होमपेज › Aurangabad › 1 जानेवारीपर्यंत मुदत

रब्बी हंगामासाठी पीक विमा भरण्यास सुरुवात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पीकविमा भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी एक जानेवारी 2018 पर्यंतची मुदत दिली आहे. कर्जदार शेतकर्‍यांना पीकविमा भरणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी दिली.

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या आहेत. रब्बी पिकांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, करडई आदी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. यामध्ये जिल्ह्यात 8 हजार 582 हेक्टरवर गहू, औरंगाबाद जिल्ह्यात 28 हजार 176 हेक्टर क्षेत्रावर हरभरा तर 66 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. दरम्यान शासनाने रब्बी हंगाम 2017-18 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन केले आहे.

यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांना पीकविमा भरणे हे बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्‍यांना पीकविमा भरणे ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्‍ता आकारला जाणार आहे. रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा अन्नधान्ये व गळीत धान्य पीकासाठी विमा संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के तर नगदी पीक असणार्‍या कांद्यासाठी 0.5 टक्के आहे. या योजनेअंतर्गत सर्व पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तर देय राहणार आहे. शेतकर्‍यांनी पीक विमा हा राष्ट्रीयीकृत बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरणे आवश्यक आहे. 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात त्याचबरोबर नजीकच्या बँक तसेच विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे.