Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Aurangabad › ‘इनकमिंग’मुळे भाजप बदनाम

‘इनकमिंग’मुळे भाजप बदनाम

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 1:31AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

लग्नासाठी स्थळ पाहायला जाताना जेवढी चौकशी केली जायची, तितकीच चौकशी एखाद्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश देताना केली जात होती. आता मात्र खुनाचा गुन्हा असणारा आणि वेडा या दोघांना सोडून कोणालाही प्रवेश दिला जात आहे. पक्ष बदनाम होईल, अशा व्यक्‍ती आता भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने मनाला दुःख होते, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजपमधील ‘इनकमिंग’वर सोमवारी येथे टीका केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम सीमंत मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. रामभाऊ गावंडे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, देवजीभाई पटेल, दयाराम बसैये, ज्ञानोबा मुंडे, तसेच जनसंघ व वाजपेयींचा सहवास लाभलेले जुने कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

अटलबिहारी वाजपेयी हे आणीबाणीपर्यंत जनसंघाचे अध्यक्ष होते. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपत पूर्वी कार्यकर्त्यांची निवड अत्यंत काटेकोरपणे व सर्व बाबी तपासून केली जायची. सध्या परिस्थिती तसेच पक्षही बदलला आहे. आता पक्षात कोणालाही सहज प्रवेश दिला जातो, अशी खंत बागडे यांनी व्यक्‍त केली.

पूर्वी भाजपचा कार्यकर्ता घरी आल्यास पाहुणा आल्यासारखा आनंद व्हायचा. आता पक्षात कोणालाही प्रवेश दिला जात आहे. पक्षाचा आता वटवृक्ष झाला आहे, मात्र ज्यांनी या वटवृक्षाच्या वाढीसाठी मेहनत घेतली ते जुने कार्यकर्ते दुर्लक्षित राहात आहेत. 25 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे प्रवेश दिले जात होते, त्याच पद्धतीचा आता अवलंब करण्याची गरज आहे. खुनाचे आरोप असणारे आणि वेडे वगळता आता सर्वांनाच प्रवेश दिला जात असून, त्यामुळे पक्ष बदनाम होत असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपला यश मिळत असले, तरी मूळ विचार आणि हेतू जपले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. देशात पूर्णपणे भाजपची सत्ता येऊन पंतप्रधान पदावर भाजपचा व्यक्‍ती विराजमान होईल, असे भाकीत वाजपेयी यांनीच सर्वप्रथम केले होते, अशी आठवणही बागडे यांनी सांगितली. 

गायकवाड यांनी सावरली बाजू

या कार्यक्रमास पक्षात नव्याने आलेले कार्यकर्तेही उपस्थित होते. बागडे यांच्या टोलेबाजीमुळे ते नाराज होतील, या शक्यतेने जयसिंगराव गायकवाड यांनी बाजू सावरून घेतली. लोकशाहीत पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांना पक्षात प्रवेश द्यावाच लागतो, असे गायकवाड यांनी सांगितले.