Thu, Jul 16, 2020 09:43होमपेज › Aurangabad › घाटीत ५० लाखांचे सौंदर्योपचार यंत्र पडून

घाटीत ५० लाखांचे सौंदर्योपचार यंत्र पडून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


औरंगाबाद ः प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात(घाटी) गेल्या चार महिन्यांपासून फ्रॅक्शनल कार्बनडायऑक्साईड अ‍ॅबिलेटिव्ह लेझर हे 50 लाखांचे सौंदर्योपचार यंत्र  धूळखात पडून आहे. जीएसटीमुळे किमतीत घोळ झाल्याने हे यंत्र पडून असल्याची माहिती कार्यलयीन सूत्रांनी दिली. 

घाटीसाठी वर्ष 2016-17 साठी यंत्रसामग्री खरेदीला 50 लाखांचा निधी जाहीर झाला होता. त्वचारोग विभागात अत्याधुनिक उपचार करणार्‍या यंत्र खरेदीला मान्यता मिळाली. यंत्राची किंमत 10 लाखांहून अधिक असल्याने सचिव पातळीवरून याच्या  निविदा मागवण्यात आल्या होत्या. प्रक्रियेनंतर फ्रॅक्शनल कार्बनडायऑक्साईड अ‍ॅबिलेटिव्ह लेझर हे 50 लाखांचे यंत्र जून महिन्यात खरेदी करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात हे यंत्र घाटी रुग्णालयात आले. दरम्यान जुलै महिन्यात जीएसटी लागू झाल्याने कंपनीला या यंत्रावर 13.5 टक्के जीएसटी भरावा लागणार होता, यामुळे यंत्राची किंमत 55 लाख रुपये झाली. यंत्र घाटीत दाखल झाल्यानंतर कंपनीला पैसे दिले जाणार होते.

जीएसटी लागू झाल्याने कंपनी 55 लाख रुपये मागते आहे, तर निविदेनुसार 50 लाख देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कंपनीचे लोक वारंवार चकरा मारूनही विभागप्रमुख डॉ. सुधीर मेढेकर यंत्राचे इन्स्टॉॅलेशन करून घेत नव्हते. त्यांनी संचालनालयाचा पत्रव्यवहार करून 3 महिन्यांपूर्वी मार्गदर्शन मागवले आहे. मात्र, त्यावर अद्याप कुठालाही निर्णय आलेला नाही.