होमपेज › Aurangabad › सावधान ! विद्यार्थ्यांना गंडविणारी टोळी सक्रिय

सावधान ! विद्यार्थ्यांना गंडविणारी टोळी सक्रिय

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 30 2018 12:43AMऔरंगाबाद : गणेश खेडकर

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना हेरायचे. एकट्याला रस्त्यावर गाठायचे अन् भविष्य सांगतो, मला तुमच्या मनातले ओळखता येते, अशी बतावणी करून विद्यार्थ्याकडील बॅग, मोबाइल, पैशांचे पाकीट स्वतःकडे ठेवून घ्यायचे आणि संधी साधून धूम ठोकायची. या भामट्यांनी अशाच पद्धतीने आतापर्यंत जवळपास तीन विद्यार्थ्यांना गंडविले आहे. एका पोलिसाच्या चुलत भावाची फसवणूक केल्यानंतर सीसीटीव्ही तपासून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका फौजदाराने ही माहिती दै. ‘पुढारी’ला दिली. 

त्याचे झाले असे, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. औरंगपुरा, नागेश्‍वरवाडी, खडकेश्‍वर, स. भु. कॉलनी, उस्मानपुरा भागात खोली करून राहायला लागल्यावर ही मुले शिकवणी, कॉलेजसाठी पायी ये-जा करतात. त्यांना शहराची जास्त माहिती नसल्यामुळे ते सहज कोणीही आवाज दिला तरी मदत करण्याच्या उद्देशाने थांबतात. याचाच गैरफायदा घेऊन काही भामट्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा सपाटा सुरू केला आहे. क्रांती चौक ते सिल्लेखाना रस्त्यावर अशीच एक घटना घडली. अंदाजे 24 ते 25 वर्षांचा विद्यार्थी पाठीवर बॅग अडकवून पायी जात होता. 40 ते 45 वर्षीय भामट्याने त्याला आवाज देऊन थांबविले. त्यानंतर त्याच्याशी धर्म, भविष्य याबाबत बोलण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याचाच एक साथीदार तेथे येऊन काय सुरू आहे? हे पाहात उभा राहतो. पहिल्या भामट्याच्या बतावणीत विद्यार्थी अडकत नसेल तर तर दुसरा भामटा त्याला ‘जाऊ दे ना, एकदा करून पाहू’ असे सहज बोलून राजी करतो.

तसेच, आपण याला ‘जय बजरंग बली’ म्हणायला लावू, असे तोच विद्यार्थ्याच्या कानात पुटपुटतो. त्यानंतर दुसरा भामटा येऊन, त्यांना उद्देशून म्हणतो. मला माहिती आहे, तुमच्या मनात काय सुरू आहे. माझ्यावर तुम्ही शंका घेत आहात. माझ्याकडून तुम्ही ‘जय बजरंग बली’ म्हणवून घेण्याचा विचार करीत आहात, असे ठरलेले वाक्य बोलतो. त्यानंतर विद्यार्थ्यालाही त्याच्यावर विश्‍वास बसतो. त्यामुळे भामटा सांगेल ते करण्यास विद्यार्थी तयार होतो. ठरल्याप्रमाणे पहिला भामटा दुसर्‍याला बॅग, मोबाइल, पैशांचे पाकीट ठेवून 80 पावले दूर जायला सांगतो. तो माघारी आल्यावर हाच प्रकार विद्यार्थ्याला करायला लावला जातो. विद्यार्थी 80 पावले दूर गेल्यानंतर हे दोन्ही भामटे बॅग, पैशांचे पाकीट, मोबाइल घेऊन पळून जातात. आपल्याला उल्लू बनविले, हे लक्षात आल्यावर विद्यार्थी हताश होऊन खोलीवर पोहोचतो. अशाच प्रकारे शहरात तीन घटना घडल्या असून विद्यार्थ्यांनी भीतीपोटी पोलिसांत तक्रार दिली नाही. पण, मंगळवारी पोलिसाच्याच चुलत भावाला या भामट्यांनी गंडविले. त्यांनी सीसीटीव्ही तपासून भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, काहीही उपयोग झाला नाही.