Tue, Jul 16, 2019 10:10होमपेज › Aurangabad ›  बकोरियांमुळे 35 शाळांत पडला ‘प्रकाश’

 बकोरियांमुळे 35 शाळांत पडला ‘प्रकाश’

Published On: Jul 10 2018 1:31AM | Last Updated: Jul 10 2018 1:31AMऔरंगाबाद : राहुल जगदाळे

शाळेत संगणक आणि डिजिटल कक्ष. सर्व सोयीसुविधांमुळे या जि. प. शाळेच्या शिरपेचात ‘आयएसओ’चा तुराही रोवला गेला; परंतु विजेअभावी सर्वकाही निष्फळ ठरत होते. कारण वीज बिल थकल्याने अशा 35 शाळांचा अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होता. त्याकडे ना गावकरी लक्ष द्यायला तयार होते, ना जि. प. प्रशासन. ही बाब महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरियांच्या लक्षात आली. मग काय या शाळा ‘प्रकाश’मान करण्यासाठी बकोरिया यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. महाविरतणच्या शिल्लक निधीतून त्यांनी या शाळांचे वीजबिल चुकते केले अन् अंधाराच्या खाईतील या आयएसओ शाळा पुन्हा उजळल्या!

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना आयएसओ मानांकन मिळालेले आहे. मात्र, वीजबिल थकल्याने बहुतांश शाळांचे कनेक्शन कापल्याने वर्गात अंधार पसरला आहे. जिल्ह्यातील तब्बल 943 शाळांकडे थकलेल्या वीजबिलाचा आकडा 20 लाखांवर आहे. जि. प. निधीतून बिल भरण्याची तरतूद नाही आणि लोकवर्गणीतून शक्य होत नसल्याने शाळा अंधारात आहेत. ही बाब महावितरणच्या औरंगाबाद विभागाचे व्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांच्या लक्षात आली. त्यांनी जि. प. शिक्षण विभागाकडून वीजबिल थकलेल्या जिल्ह्यातील आयएसओ शाळांची आणि बिलांची माहिती मागवली. अशा 35 शाळांचे 3 लाख 53 हजार 860 रुपये रखडल्याचे समोर आले. काही महिन्यांपूर्वी महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी समाजिक कार्यासाठी एक दिवसांचा पगार जमा केला होता. त्यातील रकमेतून या शाळांचे बिल भरण्याची कल्पना सूचली आणि तत्काळ ते अदाही केले.