Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Aurangabad › आमिषाने शिक्षकाला साडेपाच लाखांचा गंडा

आमिषाने शिक्षकाला साडेपाच लाखांचा गंडा

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 29 2018 1:05AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आश्रमशाळेवर कायमस्वरूपी शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र देत संस्थाचालकाने शिक्षकाला साडेपाच लाखांना गंडा घातला आहे. महेश सुदाम दंडिमे (28, रा. नंदनवन कॉलनी) यांनी याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी दीपक नाथाजी रायमान पाटील या पुण्याच्या संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महेश दंडिमे हे खासगी शिक्षक म्हणून काम करतात. 2017 मध्ये त्यांना ओळखीतील एका व्यक्तीने ढोरेगाव येथील अनुसूचित जमाती निवासी आश्रमात शिक्षक म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. यासाठी संबंधित संस्थाचालकाचे नाव त्यांनी महेश यांना सांगितले. महेशने त्यांच्या मध्यस्थीने संस्थाचालक दीपक पाटील यांची भेट घेतली. कायमस्वरूपी शिक्षक पदासाठी संस्थाचालकांनी त्यांना 5 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली.

नोकरीच्या अपेक्षेने महेश 10 जून, 2017 रोजी संस्थाचालकांना साडेपाच लाख रुपये दिले. त्यानंतर महेश यांना शाळेवर रुजू होण्यासाठी सांगितले. महेश यांनी जवळपास चार ते पाच महिने विनावेतन काम केले. मात्र संस्थाचालक पगार देत नसल्याने त्यांनी याबाबत वारंवार मागणी केली. संस्थाचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महेश यांना संशय आला. त्यावर महेश यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना दिलेले नियुक्तीपत्रच खोटे असल्याचे समोर आले. फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर महेश यांनी छावणी ठाण्यात तक्रार दिली.