Sun, Apr 21, 2019 14:08होमपेज › Aurangabad › विदेशी पर्यटकांची औरंगाबादकडे पाठ

विदेशी पर्यटकांची औरंगाबादकडे पाठ

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 09 2018 1:55AMऔरंगाबाद : प्रताप अवचार

पर्यटन नगरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची देशभरात ओळख आहे. एकेकाळी शहरातील रस्त्या-रस्त्यांवर भारतीय पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांची गर्दी दिसत असे, परंतु मागील दोन वर्षांपासून शहरात येणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे एमटीडीसी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात देशभरातून पर्यटक दाखल होतात. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की, तसेच वेरूळ येथील लेणी, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर आदी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी विदेशातील पर्यटक जिल्ह्यात दाखल होतात. मात्र दोन वर्षांपासून विदेशातून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये 74 हजार 67 विदेशी पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. तर एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 65 हजार 937 विदेशी पर्यटकांनी जिल्ह्यात हजेरी लावली होती. तर एप्रिल 2017 ते अद्यापर्यंत शहरात फक्त 20 हजार 762 पर्यटकांनीच हजेरी लावली आहे. प्रशासनाकडून पर्यटनस्थळांचा योग्य प्रचार व प्रसार होत नसल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटत आहे.
भारतीय पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटकांनी औरंगाबाद जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या पद्धतीने योग्य प्रचार व प्रसार झालेला नाही. राजस्थान व भोपाळ दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक दाखल होतात. या ठिकाणाहून थेट औरंगाबाद अशी कनेक्टीव्हीटी होणे गरजेचे आहे. या दोन्ही बाबींचा अभाव असल्यामुळे येथील पर्यटनावर परिणाम होत आहे.

जसवंतसिंग, अध्यक्ष, टुरिस्ट विभाग, एमटीडीसी