Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Aurangabad › फुलंब्री नगरपंचायतीत एमआयएम-भाजप साथ साथ

फुलंब्री नगरपंचायतीत एमआयएम-भाजप साथ साथ

Published On: Jan 20 2018 2:04AM | Last Updated: Jan 20 2018 2:04AMफुलंब्री :­ प्रतिनिधी

नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत सदस्यांकरिता भाजपने फुलंब्रीत एमआयएमसोबत हातमिळवणी केली आहे. एमआयएमचे निवडून आलेले एकमेव नगरसेवक जफर चिस्ती यांनी केलेल्या मदतीमुळे भाजपने विरोधी आघाडीला पराजित केले आहे. उपनगराध्यक्षपदी इंदूबाई मधुकर मिसाळ यांचा विजय झाला, तर स्वीकृत सदस्यपदी अ‍ॅड. आसेफ अश्फाक पटेल व चंद्रशेखर पालकर यांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यांकरिता भाजपने दोन गट तयार करून आपली चाल खेळली. यात त्यांना एमआयएमची मोठी मदत झाली. 

उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्याच्या दोन्ही जागा भाजपने मिळविल्या आहेत. ही निवड शुक्रवारी पार पडली. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी काम पाहिले. निवड प्रकिया सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. स्वीकृत सदस्यांसाठी दोन जागा होत्या. भाजपचे 11 नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे एकूण 12 सदस्य होते. यात दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी एक नगरसेवक कमी होता. एमआयएमचे नगरसेवक जफर चिस्ती हे भाजप गटात सामील झाले. यामुळे 13 नगरसेवकांच्या संख्येने भाजपने अ व ब असे दोन गट निर्माण केले. एका गटाचे नेतृत्व इंदूबाई मिसाळ तर दुसर्‍या गटाचे नेतृत्व अकबर पटेल यांनी केले. एका गटात सहा तर दुसर्‍या गटात सात नगरसेवकांची गट संख्या करण्यात आली. यात अ गटाने अ‍ॅड. आसेफ पटेल यांना पाठिंबा दर्शविला, तर ब गटाने चंद्रशेखर पालकर यांना पाठिंबा दिला. 

विरोधी आघाडीकडे पाच नगरसेवक होते. त्यांनी अ‍ॅड. अल्ताफ काझी यांना पाठिंबा दिला होता. या निवडीची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात झाली. यात जे स्वीकृत सदस्य बहुमतात आहेत त्यांचा दस्तावेज पाकीटमध्ये नगरपंचायतकडे पाठविण्यात आला. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष सुहास सिरसाठ व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी हे पाकीट उघडून यातील दोन निवड झालेले स्वीकृत सदस्य घोषित केले. अशा प्रकारे अ व ब गटाची शक्‍कल लढवून भाजपने एमआयएमच्या मदतीने दोन्ही जागा प्राप्‍त केल्या आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत इंदूबाई मिसाळ यांचा विजय झाला. हात उंचावून यासाठी मतदान घेण्यात आले. यात मिसाळ यांना 13 तर त्यांच्या विरोधी मोहिनी काथार यांना आघाडीची पाच मते मिळाली. इंदूबाई यांचा आठ मतांनी विजय झाला. निवड प्रक्रिया झाल्यानंतर नगरपंचायतीसमोर ढोल-ताशांच्या गजरात, भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करून आनंद व्यक्‍त केला.