Wed, Mar 27, 2019 06:14होमपेज › Aurangabad ›  फुलंब्री नगरपंचायतमध्ये कमळ फुलले

 फुलंब्री नगरपंचायतमध्ये कमळ फुलले

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:19AM

बुकमार्क करा

फुलंब्री : प्रतिनिधी

नगरपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत भाजपने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी सुहास शिरसाठ यांचा विजय झाला आहे. 17 पैकी 11 वॉर्डात कमळ फुलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीला केवळ पाच जागांवरच समाधान मानावे लागले. 

गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीची चर्चा होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक डिसेंबर पासून प्रचाराला सुरुवात झाली. बारा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. सभा, कॉर्नर बैठकांनी शहर ढवळून निघाले होते. भाजपच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी आघाडी उभी राहिली होती. यामुळे मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अटीतटीच्या या लढतीसाठी बुधवारी मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी झाली. यात भाजपने बाजी मारत 11 जागांवर वर्चस्व सिद्ध केले. एमआयएमने एक जागा मिळवली आहे. 

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे सुहास शिरसाठ यांच्याविरोधात आघाडीचे राजेंद्र ठोंबरे उभे होते. दोघांमध्ये काट्याची टक्कर झाली.  ठोंबरे यांना 5 हजार 126 तर शिरसाठ यांना 5 हजार 316 मते मिळाली. 190 मतांनी शिरसाठ निवडून आले. 

एकट्या सुहाससाठी दिग्गज एकत्र...

नगराध्यक्षपदी निवडून आलेले सुहास शिरसाठ हे गेल्या 15 वर्षांपासून सरपंच आहेत. या 15 वर्षांचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांनी एकत्र येऊन आघाडी तयार केली. तीनही पक्ष एकत्रीत आले. पक्षाचे चिन्ह न घेता ग्रामपंचायतीसारख्या सर्वसाधारण निशाण्या घेतल्या. निवडणूक लढवली. मात्र, शिरसाठ यांनी आघाडीचे पानीपत केले. त्यांच्याबरोबर 11 नगरसेवक निवडून आले. 

आघाडीचे नेते फेल !

माजी आमदार डॉ. कल्याण काळे व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नामोहरण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. सत्तार यांनी सभा, कॉर्नर बैठका घेतल्या. याचबरोबर शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे यांच्यासाठी खा. चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. शिरसाठ यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भागवत कराड, उपमहापौर विजय औताडे, आ. अतुल सावे, सिद्धेश्वरचे चेअरमन इद्रीस मुलतानी, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस एजाज देशमुख, सुनील मिरकर, प्रदीप पाटील, सभापती सर्जेराव मेटे, तालुकाध्यक्ष गोविंद वाघ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी प्रचाराचा समारोप केला. प्रतिष्ठेच्या या लढतीत अखेर भाजपने बाजी मारली. आघाडीला पराजय पत्करावा लागला. 

या उमेदवारांनी मारली बाजी

भाजपकडून एकनाथ महादू ढाके, द्वारका संतोष जाधव, शामबाई किसन गुंजाळ, अश्‍विनी वाल्मिक जाधव, इंदुबाई मधुकर मिसाळ, वैशाली बाबासाहेब शिनगारे, गजानन दत्तात्रय नागरे, अकबर जानू पटेल, अजय वामनराव शेरकर, रत्ना वाळूबा सोनवणे, गणेश कृष्णा राऊत हे उमेदवार विजयी झाले आहेत. आघाडीकडून मनसुरी सुमैय्या रफीक, मुदस्सीर अझगर पटेल, गयाबाई रुपचंद प्रधान, रऊफ मजीद कुरेशी, मोहिनी संदीप काथार हे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर एमआयएमकडून जफर चिस्ती यांनी विजय मिळवला आहे.