Mon, Nov 19, 2018 23:07होमपेज › Aurangabad › ‘शिवरायांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ’

‘शिवरायांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ’

Published On: Jan 06 2018 12:51PM | Last Updated: Jan 06 2018 12:51PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवरही एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती. ते वंशज तो हिरा घेऊन मुंबईच्या जव्हेरी बाजारात गेले. त्यावेळी छत्रपतींच्या वंशजांच्या मदतीसाठी धावून आला तो माहेश्‍वरी समाजचा व्यापारी. या माहेश्‍वरी व्यापार्‍याने हा लिलाव थांबवून छत्रपती शिवरायांच्या वंशजांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत केली, असा खळबळजनक दावा शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी औरंगाबादेत केला. महाराष्ट्र प्रदेश व औरंगाबाद जिल्हा माहेेशरी युवा संघटनेतर्फे कलाग्राम येथे ‘महाराष्ट्र ट्रेड फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जाजू यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

प्रदर्शनाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना जाजू म्हणाले, व्यवसाय हा माहेेशरी समाजाच्या रक्तातच आहे. पूर्वी माहेश्‍वरी समाजाच्या हाती तलवार होती. आता तराजू आला आहे. कोणत्याही मातीत गेल्यावर तेथील समाजाशी एकरूप होऊन तो व्यवसाय करतो, योगदान देतो. याचे उदाहरण देत जाजू पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातार्‍याची गादी असलेल्या वंशजांवर एकदा अनमोल हिरा विकण्याची वेळ आली. ते हिरा विकण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाले. हिरा विकण्यासाठी भोसले स्वत: पुढे न जाता त्यांनी दुसर्‍या एकाला पुढे पाठविले. तो अनमोल हिरा पाहून व्यापारी अचंबित झाले. ‘हा अनमोल हिरा कुणाचा आहे’ असे व्यापार्‍यांनी ‘त्या’ व्यक्तीला विचारले, त्यावर त्याने हा राजेभोसलेंचा हिरा आहे, असे सांगितले. त्यानंतर राजेभोसले पुढे आले.

मग हिर्‍याचा लिलाव सुरू झाला. बोली लागत 65 लाखांपर्यंत गेली. हा सर्व प्रकार त्या बाजारातील माहेश्‍वरी समाजाच्या एका व्यापार्‍याने पाहिला. तो व्यापारी पुढे आला. ‘छत्रपती शिवरायांच्या संपत्तीचा अशा पद्धतीने आम्ही लिलाव होऊ देणार नाही. हा हिरा तुम्ही परत घेऊन जा’ असे म्हणत त्या व्यापार्‍याने हा लिलाव थांबविला आणि ‘तुम्हाला किती पैशांची गरज आहे, अशी राजेभोसलेंकडे विचारणा केली. 50 लाखांची गरज असल्याचे समजल्यानंतर या माहेश्‍वरी व्यापार्‍याने स्वत: कोणतेही तारण, चेक न घेता भोसलेंना 50 लाखांची मदत केली. तसेच हिरा परत केला. असा हा माहेश्‍वरी समाज. ही समाजाची खरी ओळख आहे. सर्वांत पुढे जाऊन मदत करणारा हा माहेश्‍वरी समाज आहे, असेही जाजू म्हणाले. जाजू यांच्या या दाव्यावरून नवे वादंग उभे राहण्याची शक्यता आहे.