Fri, Apr 19, 2019 12:20होमपेज › Aurangabad › भाजप आमदार आणि फौजदारात ‘तू-तू, मै-मै’ (Video)

आमदार आणि फौजदारात ‘तू-तू, मै-मै’ (Video)

Published On: Jun 17 2018 8:47AM | Last Updated: Jun 17 2018 8:47AMगंगापूर  :  रमाकांत बनसोड 

गंगापूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरून आमदार प्रशांत बंब आणि एका पोलिस अधिकार्‍यात चांगलीच ‘तू तू मै मै’ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला आहे. ‘मी नऊ वर्षांत आपणास कोणती बेकायदेशीर कामे करण्यास सांगितली. तुम्ही आतापर्यंत किती कायदेशीर कारवाया केल्या, त्याचे मला उत्तर द्या, असा जाब आमदार बंब यांनी पोलिसांना विचारल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. 

एका गुटखा विक्रेत्यावर कारवाई न करता पन्नास हजार रुपये घेऊन त्याची  गाडी सोडल्यामुळे आमदार बंब यांनी गंगापूर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना जाब विचारला असता, तुम्हीच सांगितले म्हणून गाडी सोडली, असे प्रतिउत्तर इंगळे यांनी बंब यांना दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मी नऊ वर्षांत तुम्हाला कोणती बेकायदेशीर कामे करण्यास सांगितले. तुम्ही आतापर्यंत अवैध धंदे करणार्‍या किती लोकांवर कायदेशीर कारवाई केली, असा प्रश्‍न आमदार बंब यांनी विचारल्यानंतर, मी रोज अवैध धंदे करणार्‍यांच्या शंभर गाड्या सोडतो, असे उलट उत्तर इंगळे यांनी दिले.
तुम्ही बेकायदेशीर कामे का करता?, माझ्या मतदारसंघात व तुमच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे मी चालू देणार नाही. अवैध धंदेचालकांवर कारवाई झालीच पाहिजे, असे आमदार बंब बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. याच अवैध धंद्यांवरून आमदार बंब आणि इंगळे यांच्यात  तू तू मै मै झाल्याबाबतच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला आहे.

इंगळेंविरुद्ध अनेक तक्रारी

फौजदार इंगळे यांच्याविरुद्ध नागरिकांनी माझ्याकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात 18 ठिकाणी अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे, असे अवैध धंदे सुरू आहेत. मोटारसायकल अडवून पैसे उकळणे, गुटख्याची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी पैसे घेऊन सोडून देणे, वाळूच्या वाहनांकडून हप्ते वसुली, नागरिकांना विनाकारण मारहाण करणे आदी तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत, असे आ. बंब यांनी सांगितले. 

इंगळे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले 

या प्रकरणाबाबत पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता  जे काही सांगायचे ते मी आमच्या वरिष्ठांना कळविले आहे. मला तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास वरिष्ठांकडून घ्या, असे पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनी सांगितले.

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंगळे यांच्या कार्यक्षेत्रात 18 ठिकाणी अवैध धंदे चालतात. याबाबत मी पुराव्यानिशी वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. याशिवाय मी बैठकीसाठी तहसील कार्यालयात आलो असता नागरिकांनीदेखील इंगळे यांच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी केल्या. त्यावरून त्यांना मी  जाब विचारला असता त्यांनी अरेरावी केली.- आमदार प्रशांत बंब