Wed, Jul 24, 2019 06:21होमपेज › Aurangabad › औरंगाबाद कचरा प्रकरण: लाठीचार्ज केल्याने पोलिस आयुक्त सक्‍तीच्या रजेवर

औरंगाबाद कचरा प्रकरण: लाठीचार्ज केल्याने पोलिस आयुक्त सक्‍तीच्या रजेवर

Published On: Mar 15 2018 12:50PM | Last Updated: Mar 15 2018 12:50PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद कचरा आंदोलनप्रकरणी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि दगडफेक केल्याप्रकरणी औरंगाबादचे पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या प्रकरणात योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेक गोष्टी समोर आणणाऱ्या आहेत.  या मुद्यावर सभागृहाची भावना लक्षात घेता औरंगाबादचे पोलिस आयुक्त यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्या समितीच्या माध्यमातून एका महिन्यात चौकशी करण्यात येणार असून औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

आंदोलनप्रकरणी स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र ज्यांनी पोलिसांना मारहाण केली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर यांनी भाग घेतला.