Sat, Jun 06, 2020 08:49होमपेज › Aurangabad › प्रदूषण रोखण्यासाठी मनपा करणार जनजागृती

प्रदूषण रोखण्यासाठी मनपा करणार जनजागृती

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 04 2017 1:00AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी शहरात दृश्य फलकांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. यासाठी एक कोटी 28 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने या कामाच्या निविदेस अंतिम मंजुरी दिली आहे. हा खर्च जिल्हा विकास समिती (डीपीसी) कडून प्राप्‍त होणार्‍या निधीतून भागविला जाणार आहे. 

शहरातील हवेतील प्रदूषण वाढल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला दीड महिन्यापूर्वीच नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठीचा कृती आराखडाही तयार केला आहे. याआधी पालिकेने एप्रिल 2017 मध्ये सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून शहरात प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनपाने शहरात दृश्य फलकांद्वारे जनजागृती करण्याच्या कामाची निविदा मे महिन्यात प्रसिद्ध केली होती.

या कामाचे अंदाजपत्रक 1 कोटी 30 लाख रुपये खर्चाचे होते. परंतु पहिल्या वेळेस दोनच निविदा प्र्राप्‍त झाल्यानंतर पालिकेने या कामासाठी फेरनिविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर या कामासाठी तीन निविदा प्राप्‍त झाल्या. यामध्ये विश्‍व मल्टीसर्व्हिसेस यांची निविदा सवार्र्ंत कमी म्हणजे 1 कोटी 29 लाख 7 हजार रुपये या दराची होती. प्रशासनासोबतच्या वाटाघाटीनंतर संबंधित एजन्सीने हे काम 1 कोटी 28 लाख रुपयांत करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर प्रशासनाने ही निविदा अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवली होती. स्थायी समितीने ही निविदा एकमताने मंजूर केली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हा खर्च जिल्हा विकास समितीकडून मिळणार्‍या अनुदानातून केला जाणार आहे. 

पालिकेच्या स्थायी समितीने तीन कोटी रुपये खर्चाच्या दोन रस्त्यांच्या निविदांनाही अंतिम मंजुरी दिली. त्यानुसार रामनगर-विठ्ठलनगर वॉर्डाअंतर्गत जालना रोड ते शाहूनगर या 24 मीटर रुंद रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. सहारा कन्स्ट्रक्शन कंपनीला 2 कोटी 37 लाख रुपयांत हे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच शिवाजीनगर बारावी योजनेपासून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणार्‍या विकास योजनेतील रस्त्याचे व्हाईट टॅपिंग केले जाणार आहे. हे काम स्टार कन्स्ट्रक्शन कंपनीस 73 लाख 68 हजार रुपयांत देण्यात आले आहे.