Wed, Feb 20, 2019 08:45होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : रोजंदारीवर ठेवले चोरटे

औरंगाबाद : रोजंदारीवर ठेवले चोरटे

Published On: Jan 07 2018 7:25PM | Last Updated: Jan 07 2018 7:25PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

तामिळनाडूच्या म्होरक्याने झारखंडमधील तरुणांना रोजंदारीवर चक्‍क चोरी करण्याच्या कामाला लावल्याचे उघडकीस आले. चारचाकी वाहनाने परजिल्ह्यात जायचे. रात्रीतून मोठ्या दुकानांचे शटर उचकटून डल्ला मारायचा आणि लाखोंचा ऐवज लंपास करायचा, अशी अनोखी पद्धत राबवून ही टोळी चोरी करीत असे. या टोळीच्या ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 6) नाशिक येथून मुसक्या आवळल्या असून, सात जणापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. 

मुस्तफा अब्दुल अन्सारी (वय 20, रा. खेरा टुंडा, झारखंड), सर्फराज हरूण अन्सारी (24, रा. जामतेरा, झारखंड), वहिदोद्दीन ऊर्फ सर्फराज शमशोद्दीन खान (23, रा. देवळाई, जि.नाशिक), विकास पाराजी गवते (25, धनगर गल्ली, देवळाई) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. 28 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी गंगापूर येथील न्यू यश मोबाईल दुकानाचे शटर तोडून 98 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली. दरम्यान, तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, हवालदार रतन वारे, विठ्ठल राख, आशिष जमदाडे, रामेश्‍वर धापसे, योगेश तरमाळे, वसंत लटपटे यांनी नाशिक येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता वैजापूर येथील शंभू बीअर बार फोडून विदेशी दारू चोरल्याची आणि मोबाइल व इलेक्ट्रॉनिक दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली.

 सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सात जणांच्या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक पिकअप व्हॅन आणि मोबाइल असा 2 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, नाशिक येथील एकाला ही टोळी चोरीचा माल विक्री करायची, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे