Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Aurangabad › अनेक भागांत दगडफेक, बाजारपेठा बंद करण्याचे आवाहन

भीमा-कोरेगावचे औरंगाबादेत पडसाद

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:58AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद सोमवारी औरंगाबादेतही उमटले. दुपारी चार वाजेनंतर शहरातील अनेक भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने बंद पाडली. त्यामुळे शहरात अफवेचे पेव फुटले आणि पाहता पाहता सायंकाळपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. रस्ते ओस पडले. या घटनांमुळे शहरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारानंतर संपूर्ण शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. 

भीमा-कोरेगाव येथे सोमवारी सकाळी दोन समूहात झालेल्या वादातून जातीय तेढ निर्माण झाली. तेथे मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली. दुपारपर्यंत ही वार्ता सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. नंतर वेगवेगळ्या अफवांचे पेवही फुटले आणि दुपारनंतर त्याचे पडसाद इतर शहरांत उमटण्यास सुरुवात झाली. 

दुपारी चार वाजेच्या सुमारास उस्मानपुर्‍यात एक मोठा जमाव रस्त्यावर उतरला. या जमावाने घोषणाबाजी करीत परिसरातील दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ उडाला. भीतीपोटी व्यापार्‍यांनी पटापट आपली दुकाने बंद केली. याच ठिकाणी किरकोळ दगडफेकही करण्यात आली. त्यानंतर एका जमावाने क्रांती चौकातही अशाच पद्धतीने दुकाने बंद पाडत रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या वाहनांवर दगडफेक केली. येथेही बरीच वाहने फोडण्यात आली.

शिवाजीनगर, पुंडलिकनगर या भागातही दगडफेकीच्या घटना घडल्या. मुकुंदवाडी येथे लाईफ केअर हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात आली. तसेच येथेही काही वाहने फोडली. जळगाव रोडवरही एका जमावाने 10 ते 15 चारचाकी वाहनांवर दगडफेक केली. तसेच चिकलठाणा, ब्रिजवाडी, नारेगाव, बीड बायपास, वाळूज, पैठण रोडवरही दगडफेकीच्या घटना घडल्या. जवाहर कॉलनीतील त्रिमूर्ती चौकातही दुकानांवर दगडफेक झाली. एका दुकानदारालाही येथे मारहाण करण्यात आली. 

टीव्ही सेंटर परिसरात तणाव

टीव्ही सेंटर परिसरात सायंकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. एका जमावाने दगडफेक करीत येथे दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. येथे एका वृत्तपत्र छायाचित्रकाराचा कॅमेरा फोडण्यात आला. तर एका छायाचित्रकाराला दगड लागल्याने तो जखमी झाला. या परिसरात दगडफेकीमुळे  तणाव निर्माण झाला होता. नंतर येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.