Thu, Sep 20, 2018 16:45



होमपेज › Aurangabad › सोशल मीडिया म्‍हणतय, औरंगाबादच्या पोलिस आयुक्‍तपदी चिरंजीव प्रसाद 

सोशल मीडिया म्‍हणतय, औरंगाबादच्या पोलिस आयुक्‍तपदी चिरंजीव प्रसाद 

Published On: May 24 2018 6:16PM | Last Updated: May 24 2018 6:16PM



औरंगाबाद : प्रतिनिधी

अडीच महिन्यांपासून रिक्‍त असलेल्या पोलिस आयुक्‍तपदी चिरंजीव प्रसाद यांची नियुक्‍ती निश्‍चित झाली आहे. ते सध्या नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आहेत. मागील महिनाभरापासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गुरुवारी पुन्हा त्यांच्या नावाने जोर धरला आणि सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा शिक्‍कामोर्तब झाला. अनेकांनी तर दुपारी अडीच वाजता ऑर्डर निघाल्याचेही सांगितले. 

कचरा प्रश्‍नावरून मिटमिट्यात दंगल झाली. ती हाताळण्यात कमी पडल्याचा ठपका ठेवून पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांना मुख्यमंत्र्यांनी आयुक्‍तपदावरून हटवले होते. कचरा टाकण्यास विरोध करणार्‍या मिटमिटा येथील आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याप्रकरणी राज्य सरकारने त्यांना 15 मार्च रोजी सक्‍तीच्या रजेवर पाठविले. तेव्हापासून हे पद रिक्‍त आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक  मिलिंद भारंबे यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी अडीच महिन्यात शहराला पूर्वपदावर आणण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, जुन्या औरंगाबादेत वर्चस्ववादावरून पेटलेल्या दंगलीने त्यांच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. मागील पंधरा दिवसांपासून ते दंगलीच्या चौकशीत व्यस्त आहेत. 

कोण आहेत चिरंजीव प्रसाद ?

चिरंजीव प्रसाद हे 1996 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी 2002 ते 2004 या काळात औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी जालना आणि नागपूर येथेही काम केले. 2011 साली त्यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) नियुक्‍ती झाली. सीआरपीएफमध्ये कार्यरत असताना त्यांनी छत्तीसगड आणि बिहारमधील नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. सध्या ते नांदेड येथे विशेष पोलिस महानिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कडक शिस्तीचे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याबरोबरच शहराला पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांना खरी मेहनत घ्यावी लागणार आहे. सोबतच वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे तगडे आव्हान ही त्यांच्यापुढे असणार आहे.