होमपेज › Aurangabad › ‘संभाजीनगर’चा प्रस्ताव राज्य सरकारकडेच

संभाजीनगर’चा प्रस्ताव राज्य सरकारकडेच

Published On: Jan 15 2018 2:09AM | Last Updated: Jan 15 2018 2:04AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून शिवसेनेतील खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्यातील कलगीतुरा अजूनही सुरूच आहे. राज्य सरकाने वर्षभरापूर्वीच केंद्राकडे नामकरणाचा प्रस्ताव पाठविलेला आहे, त्यामुळे खैरे यांनी त्यांचे अपयश झाकण्यासाठी उगाच आमच्या नावे शिमगा करू नये, असे पालकमंत्री कदम यांनी काही दिवसांपूर्वीच सुनावले होते. त्यावर खासदार खैरे यांनी कदम यांचा दावा फेटाळून लावला असून नामकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून दिल्लीत आलेलाच नसल्याचे सांगितले. 

औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर करावे अशी शिवसेनेची जुनी मागणी आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच खासदारांनी याच मुद्यावरून सेनेच्याच मंत्र्यांवर तोफ डागली होती. संभाजीनगर असे नामकरण व्हावे अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, परंतु आता सत्तेत बसलेल्या आमच्याच मंत्र्यांना त्याचा विसर पडला आहे, अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री कदम यांच्यावरही टीका केली होती.

त्यावर पालकमंत्री कदम यांनी औरंगाबादेतच तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. संभाजीनगरचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेला आहे वर्षभरापासून तो प्रस्ताव तिथे पडून आहे. परंतु खासदारांकडून तिथे पाठपुरावा होत नाही. उलट त्यांचे अपयश झाकण्यासाठी ते आमच्या नावे शिमगा करीत आहेत, असे कदम म्हणाले होते. त्यावर खासदार खैरे यांनी आज रविवारी पुन्हा खुलासा केला. ते म्हणाले, मी केंद्राकडून सविस्तर माहिती मागितली. परंतु राज्य सरकारकडून अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही. त्यामुळे आता तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही ते म्हणाले. 

भागवत कराड चिल्लर माणूस

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनीदेखील खैरे हे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच संभाजीनगरचा विषय काढत असल्याची टीका काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच खैरेंच्या विरोधात लोकसभेसाठी भाजपकडून इच्छूक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यावर कोण कराड, मी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाच्या बरोबरीचा माणूस आहे, त्यामुळे त्याच्या आरोपाला उत्तर देत नाही, तो माझ्यासमोर चिल्लर आहे, असेही खैरे म्हणाले. माझ्याविरोधात कराड यांना भाजपची उमेदवारी हवी असेल तर ती मीच मिळवून देईल, असेही ते म्हणाले.