Sun, Jul 21, 2019 15:03
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › बनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट

बनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट

Published On: Dec 25 2017 1:47AM | Last Updated: Dec 25 2017 1:42AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची थाप मारून 98 हजारांची खंडणी उकळणार्‍या शेख मुश्ताक शेख मुनाफ हा बनावट कागदपत्राद्वारे भूखंड, घरे विक्री करण्याचे रॅकेट चालवीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अशाच प्रकरणात त्याच्याविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून त्याच्या टोळीत काही महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारींची रिघ लागली आहे.

दरम्यान, सेवानिवृत्त अभियंता शेख मोबीन जान मोहंमद शेख यांच्या फिर्यादीवरून शेख मुश्ताकसह शेख इर्शाद शेख हबीब, शेख मुश्ताकची भावजई अशा तिघांविरुद्ध शनिवारी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी शेख मोबीन यांना हर्सूल येथील सर्वे नं. 225/3/2 मधील प्लॉट क्र. 65 वरील घराचे बनावट कागदपत्र तयार करून ते आठ लाखांत विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत. यापूर्वी फळ विक्रेता सय्यद लाल सय्यद हबीब (47, रा. सावंगी हर्सूल) यांना जटवाडा रोडवरील एक भूखंड अशाच बनावट कागदपत्राद्वारे विक्री केला होता.

या प्रकरणात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच, मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून 98 हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी शेख मुश्ताकविरुद्ध यापूर्वीच सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून आणखी काही प्रकरणे चौकशीवर आहेत. असे चालवितात रॅकेट घर किंवा भूखंड विक्रीला असल्याची खबर लागली की, आरोपी शेख मुश्ताक याचे साथीदार आधी तेथे किरायाने राहायला जातात. भूखंड असेल तर शेजारी खोली घेऊन राहतात.

मूळ मालकाशी जवळीक करतात. त्याच्याकडून कागदपत्र घेऊन तशीच बनावट कागदपत्र तयार करतात. पुढे याच कागदपत्रांच्या आधारे घर, भूखंड विक्री केला जातो. महागाची प्रॉपर्टी अतिशय स्वस्तात देऊन रोख व्यवहार करतात. स्वस्तात प्रॉपर्टी मिळत असल्याने ग्राहकही घ्यायला लगेचच तयार होतात. शेख मुश्ताक याने सईदा कॉलनी, हर्सूल, किराडपुरा, छावणी भागात अशी बरीच घरे आणि भूखंड विकल्याचा संशय आहे. शेख मुश्ताकवर पोलिसांची नजर शेख मुश्ताक याला खंडणीच्या गुन्ह्यात सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, बेगमपुरा ठाण्याचे फौजदार सरवर शेख त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात सोमवारी ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी येत असून पोलिसांनी तक्रार अर्जावर चौकशी सुरू हे.