औरंगाबाद : प्रतिनिधी
चौदाशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. मार्चअखेरीस पालिकेची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली असून मनपाचे बँक खाते चक्क मायनसमध्ये गेले आहे. सध्या पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाकडे भरण्यासाठी मनपाकडे पन्नास लाख रुपयेही नाहीत. दुसरीकडे 6 कोटी रुपयांचा अत्यावश्यक खर्च समोर आहे. याशिवाय ठेकेदारांची तब्बल 110 कोटी रुपयांची देणी थकली आहेत.
मनपा स्थायी समितीच्या बैठकीत प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनीच बुधवारी ही माहिती दिली. बैठकीत सुरुवातीला सदस्यांनी वॉर्डातील विकासकामे ठप्प असल्याचा विषय उपस्थित केला. कंत्राटदारांची बिले निघत नसल्याने ते कामे करण्यास तयार नसल्याची व्यथाही त्यांनी मांडली. त्यावर सभापती गजानन बारवाल यांनी प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांना खुलासा करण्याची सूचना दिली. पाटणी यांनी सांगितले की, सध्या मनपाची तिजोरी रिकामी आहे. कंत्राटदारांची बिले, अत्यावश्यक खर्च अशी 110 कोटी रुपयांची देणी असून, सध्या खाते 60 लाख मायनसमध्ये आहे. पाणीपुरवठ्याच्या वीज बिलापोटी कंपनीला दोन कोटी 55 लाखांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, एवढी रक्कम खात्यात जमा नव्हती. मार्च महिन्यातील अत्यावश्यक खर्चापोटीचे 6 कोटी 68 लाख रुपये देणी शिल्लक आहे. त्यात पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीची थकबाकी भरा अन्यथा पाणी बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यांचे किमान 50 लाख रुपये भरणे गरजेचे आहे, ते न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, असे पाटणी म्हणाले. त्यावर सर्वच सदस्यांनी चिंता व्यक्त केली.
राजू वैद्य यांनी वसुलीसंदर्भात तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली. शेवटी सभापतींनी अत्यावश्यक देणी प्रथम द्या, तसेच आर्थिक शिस्त लावा, असे आदेश दिले.