Tue, Jan 22, 2019 08:23होमपेज › Aurangabad › कचर्‍यासाठी...मनपाने शोधल्या १०२ खुल्या जागा

कचर्‍यासाठी...मनपाने शोधल्या १०२ खुल्या जागा

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिका प्रशासनाने कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी शहरात 102 खुल्या जागा शोधल्या आहेत. यातील 57 जागांवर सध्या खड्डे खोदून त्यात ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती केली जात आहे. उर्वरित ठिकाणीही याच पद्धतीने खतनिर्मिती केली जाणार आहे. 

शहरातील कचराकोंडीला महिना पूर्ण झाला आहे. त्यातच आता शासनाने कचरा कुठेही साठवू नका, त्यावर प्रक्रियाच करा, असे बजावले आहे. त्यामुळे मनपाची धावाधाव सुरू आहे. नगर विकास सचिव मनीषा म्हैसेकर यांनीदेखील औरंगाबादेत बैठक घेऊन झोननिहाय कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना मनपाच्या अधिकार्‍यांना दिल्या. त्यानंतर आता मनपाने शहरात वॉर्डनिहाय पाहणी करून 102 खुल्या जागा शोधून काढल्या आहेत. यातील 57 ठिकाणी पीट कंपोस्टिंग करून ओल्या कचर्‍याचे खत तयार केले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार मेट्रिक टन कचर्‍याचे खत तयार करण्यात आले. शिवाय ज्या ठिकाणी कचरा डंप केलेला आहे, तेथे त्यावर बायोमायनिंग केले जात आहे. त्यामुळे दुर्गंधी येणार नाही. प्रत्येक प्रभागात कचर्‍याचा प्रश्न वेगळा आहे, तो सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

सुक्या कचर्‍यावर आज एनजीओंसोबत चर्चा
ओल्या कचर्‍यावर पालिकेने प्रक्रिया सुरू केली असली तरी सुक्या कचर्‍याचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरातील काही संस्थांनी सुका कचरा गोळा करून तो घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांची बैठक रविवारी सकाळी अकरा वाजता मनपाच्या संशोधन केंद्रात बोलावली आहे.