Sun, Jul 21, 2019 05:52होमपेज › Aurangabad › बंदोबस्तात औरंगाबादचे दूध मुंबईला

बंदोबस्तात औरंगाबादचे दूध मुंबईला

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 11:32PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा सहकारी दूध संघाच्या देवगिरी महानंदचे दहा हजार लिटरचे प्रत्येकी चार टँकर रात्री उशिरा मुंबईला रवाना करण्यात आले. दूध आंदोलकांनी हे टँकर अडवू नये, यासाठी पोलिस संरक्षणात पाठवण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे एक दिवसआड पुरवठा होतो; पण यावेळी सलग दुसर्‍या दिवशीही दूध पुरवठा करण्यात आला.दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून सोमवारपासून राज्यभर आंदोलन करण्यात आले. 

शहरांना, विशेषतः मुंबईला होणार दूधपुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही ठिकाणी आंदोलनास हिंसक वळणही मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यातही काही ठिकाणी दुधाची वाहतूक करणार्‍या वाहनांतील दूध रस्त्यावर फेकण्यात आले. विशेष म्हणजे भाववाढसाठी सर्वच दूध उत्पादक आग्रही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आंदोलनास पाठिंबा मिळाला.मुंबईला दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने औरंगाबाद जिल्हा दूध संघातर्फे सलग दुसर्‍या दिवशीही चाळीस हजार लिटर दूध पाठवण्यात आले. रविवारीदेखील मुंबईला दहा हजारांचे चार टँकर पाठवण्यात आले होते. एक दिवसआड याप्रमाणे मंगळवारी दूध पाठवायचे होते. मात्र, आंदोलनामुळे मुंबई शहराला दुधाचा आवश्यक पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा दूध संघातर्फे आजही दुधाचे टँकर रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे आंदोलकांच्या भीतीपोटी टँकरला पोलिस संरक्षणही घेण्यात आले आहे.

संकलनावरही परिणाम

दूध संघात जिल्हाभरातून दररोज 90 हजारांवर दूध संकलन केले जाते. मात्र, सोमवारी यात दहा हजारांवर लिटरची घट झाली. आंदोलनास पाठिंबा देत बहुतांश शेतकर्‍यांनी दूध दिलेच नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आंदोलनास मिळणार्‍या पाठिंब्यामुळे दूध संकलनावर परिणाम झाला. विशेषतः पैठण तालुक्यातून चार हजार लिटर दूध कमी आले.