Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › शेतकरी आत्महत्या आज होताहेत का?

शेतकरी आत्महत्या आज होताहेत का?

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यात आणि राज्यात रोज कित्येक शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना भाजपचे औरंगाबादेतील आमदार अतुल सावे यांनी मात्र या आत्महत्यांमागे वैयक्‍तिक कारणं असल्याचा अजब दावा केला आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या या पूर्वीपासूनच होत आहेत, त्या का आज होताहेत का ? असा उलट सवालही केला. 

भाजप व्यापारी आघाडीच्या पदाधिकारी नियुक्‍तीची माहिती देण्यासाठी सोमवारी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आ. सावे यांनी वरील दावा केला. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, कामगार मोर्चाचे संजय केणेकर, व्यापारी आघाडीचे मनोज चोपडा, नगरसेवक कचरू घोडके, नगरसेवक रामेश्‍वर भादवे, राम बुधवंत आदींची उपस्थिती होती. 

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, त्यात जीएसटीमुळे बी-बियाणे, खते महागली आहेत, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्‍न आमदार सावे यांना विचारण्यात आला. त्यावर आमदार सावे एकदम उसळले. शेतकरी आत्महत्या या काही बी-बियाणे किंवा खत मिळाले नाही म्हणून होत नाहीत. जीएसटीचा त्यांच्याशी काहीएक संबंध नाही. शेतकरी आत्महत्यांमागील कारणे वेगळी आणि वैयक्‍तिक स्वरूपाची आहेत. कुणी वैयक्‍तिक कर्ज घेतलेले असते, कुणाचे लग्‍नाचे प्रश्‍न असतात. त्यातून आत्महत्या होतात.

जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजक खूश

जीएसटीमुळे सुरुवातीला थोडा त्रास झाला, परंतु आता जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजक खूश आहेत. पूर्वी त्यांना अनेक खात्यांना हिशेब द्यावा लागत होता. आता केवळ एकाच विभागाला हिशेब द्यावा लागतो. त्यांचा ताण कमी झाला आहे. नोटाबंदीचा निर्णयही जनतेला आवडलेला आहे. नोटाबंदीनंतर झालेल्या सर्व निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले, हे त्याचेच द्योतक आहे, असेही आमदार सावे म्हणाले.