Sun, Jul 21, 2019 16:40
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › परीक्षेला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

परीक्षेला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी उशिरा येणे चांगलेच महागात पडू शकते, त्यासाठी विद्यार्थ्यांनी आता पेपरची वेळ बरोबर गाठण्याबाबत गंभीर झाले पाहिजे. कारण सध्याचे तंत्रनिकेतनचे कॉपीचे प्रकरण, तसेच गेल्या वर्षीचे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटी, कॉप्यांचे प्रमाण वाढल्याने आता परीक्षेला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे राज्य शिक्षण मंडळाच्या विचाराधीन आहे. 

गेल्या वर्षी राज्यातील बारावीचे पेपर फुटी प्रकरण तसेच गेल्या वर्षी कॉप्यांचे प्रमाण पाहता प्रश्नपत्रिका फुटू नयेत, परीक्षा अधिक चांगल्या पद्धतीने व्हाव्यात यासाठी उपाय करण्यासाठी शासनाने समिती नेमली होती. राज्याचे शिक्षण आयुक्‍त, राज्य मंडळाचे अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण संचालक, पोलिस अधिकारी या समितीचे सदस्य होते. या समितीने अहवाल तयार केला असून  नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालात काही बदल आवश्यक वाटले. ते करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे आला की यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळ विभागीय शिक्षण मंडळांना सूचना देणार आहे.

प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर पसरल्याचा सर्वाधिक फायदा उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. त्या पार्श्‍वभूमीवर आता परीक्षेला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश न देण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. तसेच परीक्षेला उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश नाकारण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना काही रास्त कारणास्तव उशीर झाला असेल तर त्याचा विचार नक्‍कीच करण्यात येईल. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना स्वतंत्र बसवून त्यांनी दिलेल्या कारणाची शहानिशा करून त्यांच्याबाबत निर्णय घेता येऊ शकेल. यासंबंधी निर्णय घेण्याचे मंडळाच्या विचाराधीन आहे.