Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Aurangabad › भाषा दिन विशेष

भाषा दिन विशेष

Published On: Feb 27 2018 2:22AM | Last Updated: Feb 27 2018 2:22AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मुख्य बसस्थानकावर 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत मराठी वाचन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दोन ते तीन प्रकाशन संस्था या ठिकाणी विविध पुस्तकांचा स्टॉल लावणार आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रक आर.एन. पाटील यांनी दिली. एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकात 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या दरम्यान मराठी वाचन सप्ताह साजरा केला जाणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवास वर्णने आदींची दालने उभारण्यात येणार आहे.

विविध प्रकारच्या प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्राच्या माध्यमातून प्रवासी आणि एसटी कर्मचार्‍यांना सवलतीच्या दरात पुस्तक उपलब्ध होणार आहेत. याकरिता पुस्तक विक्री दालनासाठी एसटी महामंडळाकडून विनाशुल्क जागा उपलब्ध करून दिली आहे. मराठी भाषा गौरव दिन सप्ताहात कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन करून हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. मराठी भाषा गौैरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमाची मंदियाळी राहणारआहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार एसटी महामंडळाच्या वतीने मराठी भाषा दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. बसस्थानकावर स्थानिक आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिन साजरा करण्यात येणार आहे.

 • मराठी मातीतला गोडवा
 • माझ्या मराठी बोलीत
 • आहे विविधतेचा गोडवा
 • या मराठीनेच शिकवला
 • शब्द पहिला ‘आई’ म्हणायला !!
 • भारूड, ओव्या, लोकगीत, जागवा
 • अजून भरपूर काव्ये मराठीत
 • जरी असली भाषा एकच
 • तरी तिचे प्रकार वर्‍हाडी, 
 • कोकणी बोलीत !!
 • साधी, सरळ, सोपी
 • भाषा असे मराठी
 • म्हणून ती आहे मायबोली
 • माझ्या सर्व बांधवांसाठी !!
 • मराठी मातीतला गोडवा
 • जगात शोधून मिळणार नाही
 • शेवटच्या श्‍वासापर्यंत
 • मी मराठीला विसरणार नाही!!

- दीक्षा ज्ञानेश्‍वर कुलकर्णी वर्ग सहावा, महर्षी विद्यालय,
 

‘मराठी भाषा आणि कवितेची परंपरा’ विषयावर व्याख्यान

 ‘स.भु. कला जगत’ उपक्रमांतर्गत कला, वाङ्मय व भाषा विषयक सर्व भाषांमधील वाङ्मयावर आधारित मासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.  याच मालिकेमध्ये मंगळवारी (दि. 27) ‘मराठी राजभाषा दिन’ निमित्ताने व ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा किंबहुनेे (विभागीय सचिव, साहित्य अकादमी, मुंबई) हे ‘मराठी भाषा आणि कवितेची परंपरा’  या विषयावर संवाद साधतील. हा कार्यक्रम  सकाळी 11.00 वा. स.भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था सदस्य उपक्रम समन्वयक श्याम देशपांडे असतील.