Wed, Jul 24, 2019 15:14होमपेज › Aurangabad › हर्सूल कारागृहात आनंद, भावुकता अन् अश्रूंचा मिलाफ

हर्सूल कारागृहात आनंद, भावुकता अन् अश्रूंचा मिलाफ

Published On: Feb 28 2018 2:24AM | Last Updated: Feb 28 2018 2:24AMऔरंगाबाद  : प्रतिनिधी

नेहमी सुनेसुने दिसणारे हर्सूल कारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार मंगळवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता महिला, मुला-मुलींच्या गर्दीने फुलले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आपल्या पित्याला भेटण्याची उत्कंठा दिसत होती. कारागृह प्रशासन नावे नोंदवून प्रत्येकाला आत सोडत होते. लेकराला बाप आणि बापाला लेकरू दिसताच सर्वांच्या भावनांचा बांध फुटला. त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत एकमेकांना मिठी मारली. तेव्हा कारागृहाच्या भिंतींना पाझर फुटला. निमित्त होते कारागृहातील बंदिवान आणि त्यांच्या 16 वर्षांखालील मुलांच्या गळाभेट कार्यक्रमाचे.

अनेकदा कळत-नकळत किंवा दारूच्या नशेत हातून गुन्हा घडतो. मात्र, नंतर त्यांच्यावर पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. अशाच काही गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही संवेदनशील ‘मन’ असते याची प्रचिती मंगळवारी हर्सूल कारागृहात आली. छोट्याशा चुकीमुळे लेकरांपासून ताटातूट झालेल्या 111 बंदिवानांनी मुलांची गळाभेट घेतल्यावर दोन तास त्यांच्यासोबत घालविले. कोणी सहा महिन्यांनंतर भेटत होता, तर कोणी कित्येेक वर्षांनंतर पहिल्यांदाच लेकराच्या गळ्यात पडला होता. यावेळी त्यांनी सोबत जेवण केले. 
एकमेकांना घास भरवत असताना सर्वांचे डोळे पाणावले. पोटात घास गेला की नाही पण गळाभेटीने मात्र सर्वांचे पोट मात्र भरले होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्यासह वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए. एस. गोसावी, आसद मोमीन यांच्यासह कारागृहातील इतर अधिकार्‍यांनी मनापासून प्रयत्न केले.