Thu, Jul 18, 2019 15:24होमपेज › Aurangabad › औरंगाबादचा कचरा आता खुलताबादेत

औरंगाबादचा कचरा आता खुलताबादेत

Published On: Aug 27 2018 1:26AM | Last Updated: Aug 27 2018 1:18AMखुलताबाद ः प्रतिनिधी

नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून औरंगाबाद शहरात निर्माण झालेला कचरा कोंडीचा प्रश्‍न अजून सुटण्याचे नाव घेत नाही. महानगर पालिकेने अनेक ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास नागरिकांकडून विरोधच झाला. शनिवारी (दि. 25) रात्री गुपचूप पुन्हा हा कचरा खुलताबाद शहराजवळ टाकल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तर थेट मनपाविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी एका अधिकार्‍यासह पाच जणांविरोधात या प्रकरणात पोलिसांनी पहिल्यांदाच गुन्हा दाखल केला आहे. 

औरंगाबाद महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्यासह राजेश जाधव, खालेद खान, सागर माने, रफिक शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यानंतर एक टिप्पर (क्र. एमएच 20 बीटी 321) पोलिसांनी जप्त केले.  

16 फेब्रुवारी रोजी नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून औरंगाबाद शहरात कचरा कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वास्ताविक पहाता हा कचरा टाकण्यासाठी मनपाने शहराजवळील चिकलठाणा, कांचनवाडी, पडेगाव, हर्सूल या चार ठिकाणांची निवड केली आहे, मात्र अधूनमधून या ठिकाणी कचरा टाकण्यास नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे काही केल्याविना कचर्‍याचा प्रश्‍न सोडविणे मनपासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा प्रश्‍न सुटत नसल्याने शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग साचत असून त्यावर पावसाचे पाणी पडत आहे. त्यामुळे या कचर्‍याची दुर्गंधी येत असल्याने शहरात विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत कचरा टाकून देण्यास मनपाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना नागरिकांकडून विरोध झाला असून तो अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही.

दरम्यानच्या काळात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेत हा कचरा टाकण्यास कन्नड तालुक्यातील पिशोरजवळील डोंगराजवळील नियोजित साखर कारखान्याच्या जागेवर परवानगी दिली होती, मात्र यावेळी मोठे राजकारण झाले, दरम्यान शनिवारी रात्री मनपाने पुन्हा हा चार टिप्पर कचरा खुलताबाद शहराजवळील म्हैसमाळ रोडवरील उरूस मैदानावर टाकला. रविवारी सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना कचर्‍याच्या दुर्गंधीचा उग्र वास येऊ लागल्याने ही वार्ता शहरात सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. ज्या ठिकाणी कचर टाकण्यात आला, ती जागा दर्गा कमिटीची असून विना परवानगी हा कचरा येथे टाकल्याने खुलताबादकर संतप्त झाले आहेत. याप्रकरणी सकाळी दर्गा कमिटीचे सचिव मोईनोद्दिन शेख यांच्यासह अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हरीश खेडकर करत आहेत.