Tue, Jul 16, 2019 14:03होमपेज › Aurangabad › गंगापूर कारखाना गैरव्यवहाराच्या फेरचौकशी

गंगापूर कारखाना गैरव्यवहाराच्या फेरचौकशी

Published On: Jan 15 2018 2:09AM | Last Updated: Jan 15 2018 2:09AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

गंगापूर साखर कारखान्यात 2009-10 मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची फेरचौकशी करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कायम ठेवले आहेत. तत्कालीन संचालक कृष्णा पाटील डोणगावकर आणि अध्यक्ष अप्पासाहेब गावंडे यामुळे अडचणीत आले आहेत. गंगापूर साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून सहकार कायद्याच्या कलम 88 नुसार संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी साखर आयुक्तांनी सेवानिवृत्त न्यायाधीश जयश्री जाधव यांची नियुक्ती केली होती.

जाधव यांनी 20 ऑगस्ट 2009 रोजी अहवाल सादर केला होता. त्यात डोणगावकर यांना क्‍लीनचिट देण्यात आली होती. साखर आयुक्तांनी हा चौकशी अहवाल फेटाळून नगर येथील सहकार खात्याचे विशेष लेखापरीक्षक रशीद शेख यांना फेरचौकशी करण्याचे आदेश 9 ऑगस्ट 2010 रोजी दिले होते. या आदेशास डोणगावकर यांनी सहकार मंत्र्यांकडे आव्हान दिले होते.  सहकार मंत्री देशमुख यांनी डोणगावकर यांचे अपिल रद्दबातल ठरवून गैरव्यवहाराची फेरचौकशी करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश कायम ठेवले आहेत. हस्तक्षेपकार सदाशिव गायके हे सुनावणीच्या वेळी हजर होते. तीन कोटी खर्च, उत्पादन मात्र 6 हजार क्विंटल

गंगापूर कारखान्याने 2009-10 या वर्षी राज्य सहकारी बँकेकडून तीन कोटी रुपयांचे पूर्वहंगामी कर्ज घेतले होते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उस उपलब्ध असल्याचा चुकीचा अहवाल सादर करून हे कर्ज मिळवल होते. कारखान्याचा गाळप हंगाम अवघा दहा दिवस चालला, तर फक्त सहा हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. उस तोडणी वाहतूक यंत्रणेला रक्कम वाटप करताना कारखान्याचे मोठे नुकसान झाले होते. या रकमेची अद्यापही वसुली होऊ शकली नाही. ओपल इंटरप्रायजेसला 89 लाख रुपये अदा करण्याचा व्यवहारदेखील संशयास्पद ठरला होता. संचालक मंडळाच्या अनास्थेमुळे कारखाना तोट्यात गेला होता, असे निष्कर्ष साखर आयुक्तांनी काढले होते.

गंगापूर कारखान्यातील गैरव्यवहाराची फेरचौकशी करण्याचा सहकार मंत्र्यांचा आदेश बेकायदा आहे. फेरचौकशीतही आम्ही निर्दोष ठरुत. सदाशिव गायके हे राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध आरोप करीत आहेत.
- कृष्णा डोणगावकर.

साखर कारखाना हे शेतकर्‍यांचे मंदिर समजले जाते. डोणगावकर यांनी त्याचे पावित्र्य तर राखलेच नाही उलट तेथील पेटीवरच डल्ला मारण्याचे काम केले आहे.
- अ‍ॅड. सदाशिव गायके.