औरंगाबाद : प्रतिनिधी
डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील 55 गावे टंचाईच्या छायेखाली आली असून, या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. टंचाई निवारणार्थ तयार केला जात असलेला टंचाई आराखडा अद्यापपर्यंत तयारच केलेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. टंचाईची ओरड होताच कर टँकर सुरू, असे टँकर लॉबी पोसण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाचे असल्याचे दिसून येत आहे.
वर्षभरापूर्वी मराठवाड्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसल्या होत्या. सातत्याने तीन वर्षे मराठवाड्यात दुष्काळ होता, औरंगाबाद जिल्ह्यातही दुष्काळाचे चटके बसले. परिणामी टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्या उपाययोजनासाठी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आराखडा तयार केला जातो. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असा तिमाही टंचाई आराखडा तयार केला जातो, मात्र यंदा पाऊस चांगला झाल्याने टंचाईचे सावट नाही. मात्र काही गंगापूर, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर या तालुक्यांवर टंचाईचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. असे असले तरी जानेवारी ते मार्च या कालावधीत टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्या उपाययोजनांचा आराखडा अद्याप तयार केलेला नाही.
55 गावे आली टंचाईच्या फेर्यात
जिल्ह्यात सुमारे साडेतेराशे गावे असून, डिसेंबरअखेरपर्यंत 55 गावांना टंचाई जाणवू लागली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या येत्या काही महिन्यांत आणखी वाढेल, या गावांमध्ये टँकर हा एकमेव पर्याय अवलंबवला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील 15 गावांमध्ये 21 टँकर सुरू झाले आहेत. तर गंगापूर तालुक्यातील 35 गावांसाठी 31 टँकर, खुलताबादेतील 4 गावांसाठी 3 आणि वैजापुरातील बाबतारा या एका गावासाठी 1 टँकर सुरू झाले आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी आणि टँकर भरण्यासाठी 34 गावांमधील 50 विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.