Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Aurangabad › भरधाव रिक्षा पेटली, तीन भावंडांचा होरपळून मृत्यू    

भरधाव रिक्षा पेटली, तीन भावंडांचा होरपळून मृत्यू    

Published On: Jan 10 2018 2:07AM | Last Updated: Jan 10 2018 2:14AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

भरधाव रिक्षाने पेट घेतल्याने शहरातील तीन भावंंडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भाजलेल्या दोन जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी मध्यरात्री नेवासाजवळ घडला आहे. जुनेद शफिक कुरेशी (वय 19), महेविश अतिक कुरेशी (वय 13) आणि निमीरा शफिक कुरेश (वय 8 रा. निजामगंज कॉलनी, संजयनगर) अशी आगीत होरपळून मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे कुरेशी कुुुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संजयनगर-बायजीपुरा भागातील निजामगंज कॉलनी येथे राहणारे व्यापारी शफिक कुरेशी यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी, नगर जिल्ह्यातील चांदा खोडेगाव येथे साखरपुडा होता.

त्यासाठी कुरेशी कुटुंबीय सोमवारी चांदा खोडेगाव येथे गेले होते. हा कार्यक्रम संपल्यावर सर्वजण औरंगाबादकडे निघाले होते. आजोबा रफिक कुरेशी हे तिन्ही मुलांसह रिक्षात (एमएच 20 ईएफ) बसून येत होते. मात्र नेवासा रस्त्यावरील खाडका फाटा रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रिक्षाने अचानक पेट घेतला. काही समजण्याच्या आतच रिक्षात बसलेले पाचही जण आगीमध्ये होरपळले. या सर्वांना पाठीमागून येत असलेल्या नातेवाईकांनी नेवासा येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी महेविश व निमिरा यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर नातेवाईकांनी रफिक कुरेशी, रिक्षाचालक समीर कुरेशी व जुनेद यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास जुनेदचा मृत्यूू झाला. जुनेद, महेविश व निमीरा हे तिघे भावंडे रेंगटीपुरा भागातील अरमा सिबली शाळेत शिक्षण घेत होते. जुनेद हा आठवी, महेविश तिसरीत तर निमीरा ही दुसरीत शिक्षण घेत होती. तिघांचा दफनविधी करण्यात आला आहे.