Wed, May 22, 2019 21:18होमपेज › Aurangabad › कॉपी पकडल्‍याने विद्यार्थ्याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (Video)

कॉपी पकडल्‍याने विद्यार्थ्याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (Video)

Published On: Apr 24 2018 7:43PM | Last Updated: Apr 24 2018 8:25PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत तासाभरात तिसर्‍यांदा कॉपी पकडल्यावर विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, तिसर्‍या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कॉलेजमध्ये बराच गोंधळ उडाला. खोकडपुर्‍यातील विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात मंगळवारी (दि. 24) सकाळी सव्वाअकरा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी पर्यवेक्षक सुहास श्रीकांत गिरी यांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यावर क्रांती चौक ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद झाला आहे.

सतीश राजू वाघमारे ( वय 26, रा. कांचनवाडी) असे विद्यार्थ्याचे नाव असून, तो विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात एम.पीएड.चे शिक्षण घेत आहे. सतीश हा सर्वसाधारण कुटुंबातील असून त्याच्या भावाची कांचनवाडीत कंप्युटर इन्स्टिट्यूट आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.पीएड. प्रथम वर्षाची परीक्षा सुरू झाली असून, मंगळवारी संख्याशास्त्राचा (अप्लाय स्टॅटेस्टीक इन फिजिकल एज्युकेशन) पहिला पेपर होता. सतीश वाघमारे याचा क्रमांक (सिट नं. एमपीडी 172024) विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरील हॉल क्र. 40 मध्ये होता. 60 विद्यार्थ्यांच्या या हॉलमध्ये 13 जण गैरहजर तर 47 विद्यार्थी हजर होते. सकाळी 10 वाजता परीक्षेला सुरूवात झाल्यावर पंधरा मिनिटांतच पर्यवेक्षक सुहास गिरी यांनी त्यांची कॉपी पकडली. त्याचा पेपर घेत हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर साडेदहा वाजता त्याला पुन्हा पेपर दिला. परंतु, पावणेअकरा वाजता गिरी यांनी सतीश वाघमारेसह अन्य विद्यार्थ्यांकडे पुन्हा कॉपी पकडली. त्यांनी सर्वांना कडक शब्दात सुनावले. दरम्यान, सव्वाअकरा वाजता सतीश वाघमारे हा समोरच्या विद्यार्थ्याचे पाहून लिहिताना आढळला. त्यावर गिरी यांनी त्याला सरळ बस, अशी सूचना केली. या प्रकारामुळे चिडलेल्या वाघमारेने उठून गिरी यांची कॉलर पकडली. त्यांना ‘तुम्हाला काय अडचण आहे’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्याने कानशिलात मारण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारामुळे परीक्षा हॉलमध्ये बराच गोंधळ उडाला. आरडाओरड झाल्यावर शेजारच्या हॉलवरील शिक्षक धावले. तसेच, हॉलमधील विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करून गिरी यांची त्याच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान, हॉलबाहेर पळालेल्या सतीश वाघमारे याने तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी घेण्याचा प्रयत्न केला परंतु, त्याला शिक्षकांनी आवरत माघारी ओढले. 

घटना सीसीटीव्हीत कैद

विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील हा खळबळजनक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यात विद्यार्थी सतीश वाघमारे हा तिसर्‍या मजल्याच्या गॅलरीच्या सुरक्षा कठड्यावरून बाहेर आल्याचे स्पष्ट दिसते. त्यावरून क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी विद्यार्थी सतीश वाघमारे याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंदविला. 

15 दिवसांतील तिसरी घटना

शहरात कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही तिसरी घटना आहे. 10 एप्रिल रोजी बीएससी नर्सिंगचा विद्यार्थी सचिन सुरेश वाघ (19, रा. नवनाथनगर, हडको) याने एमआयटी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच 21 एप्रिल रोजी नवखंडा महाविद्यालयात बी.एड.च्या विद्यार्थ्याने कॉपी पकडल्यानंतर पळत जाऊन गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, 24 एप्रिल रोजी विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती घडली.