Mon, Apr 22, 2019 23:46होमपेज › Aurangabad › कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला

कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कचराकोंडीमुळे औरंगाबाद शहराची सर्वत्र बदनामी झाली आहे. मुंबईहून प्रधान सचिव म्हैसेकर शहरात येऊन सूचना करतात. आपल्या अधिकार्‍यांना का काही सुचत नाही. आज केवळ या अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळेच सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठत आहे. या अधिकार्‍यांमुळेच आपलाही कचरा झाला आहे, अशा संतप्‍त भावना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्‍त केल्या.

सभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीत सुरुवातीलाच शहरातील कचराकोंडीचे तीव्र पडसाद उमटले. नगरसेवक राजू वैद्य यांनी कचर्‍याचा विषय उपस्थित केला. सव्वीस दिवसांनंतरही शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न कायम आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय केले याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी वैद्य यांनी केली. त्यावर अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचराकोंडी कशी उद्भवली याची माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांनी तुम्ही ठोस काय केले ते सांगा, असे म्हणत प्रशासनावर जोरदार टीका केली. अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍यापासून काही ठिकाणी खतनिर्मिती केली जात असल्याचे सांगितले. सीताराम सुरे यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिक विरोध करत आहेत. नगरसेवकांनीच मदत कशासाठी करायची, प्रशासन काय करतेय, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. एमआयएमचे अजीम शेख यांनी जुन्या शहरामध्ये प्रशासन गांभीर्याने काम करत नसल्याचा आरोप केला. संगीता वाघुले म्हणाल्या, माझ्या वॉर्डातील एक विहिर कचर्‍याने भरत आली आहे. त्यानंतर कचरा कुठे टाकणार? अशी विचारणा केली. 

...तर लोक मारतील
मनपात कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. कोणताही अधिकारी दालनात बसत नाही. मागणी करूनही कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, पथदिवे लावले जात नाहीत, कर वसुलीची बोंब आहे. असाच कारभार सुरू राहिला तर लोक आपल्याला जोड्याने मारतील, अशा शब्दांत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्‍त केली.

अधिकारी बिले काढण्याठीच तत्पर
सिद्धांत शिरसाट यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठविली. शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाची आहे, पण मनपाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासनाने मुंबईहून प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांना शहरात पाठविले. आपले अधिकारी कंत्राटदारांची बिले काढण्यासाठीच तत्परता दाखवितात, मग कचर्‍याच्या प्रश्‍नात त्यांना काही कसे जमत नाही, असा खोचक सवाल शिरसाट यांनी केला.