Wed, Jun 03, 2020 18:50होमपेज › Aurangabad › नौकाविहार हवेतच; ६२ लाख पाण्यात जाणार

नौकाविहार हवेतच; ६२ लाख पाण्यात जाणार

Published On: Dec 25 2017 1:47AM | Last Updated: Dec 25 2017 1:39AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : राहुल जगदाळे

दौलताबादच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्‍निध्यात वसलेल्या मोमबत्ता तलावामध्ये नौकाविहार प्रकल्पाचे सुंदर स्वप्न गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद दाखवत आहे, मात्र जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला 62 लाख रुपयांचा निधी खर्चून अद्याप इथे साधी होडीही सुरू झालेली नाही. खासगी संस्थेला दिलेल्या कंत्राटावर जि.प. सदस्यांनी आक्षेप घेतला, अधिकार्‍यांमध्येही उदासीनता आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प बारगळण्याची चिन्हे आहेत.

देवगिरी किल्‍ला आणि वेरूळला भेटी देणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने दौलताबादेतील मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. जिल्हाधिकार्‍यांनाही हा प्रकल्प भावला आणि पन्नास लाखांचा निधीही तत्काळ उपलब्ध करून दिला होता. आतापर्यंत सव्वाकोटी निधी या प्रकल्पासाठी देण्यात आलेला असून यातील 62 लाख रुपये खर्चून बोटिंगतळ, खिडकीघर, कॅटिंग, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी इतर सुविधांचे बांधकाम करण्यात आले. चार ते पाच वेळेस निविदा प्रक्रिया केल्यानंतर एका रिसोर्ट चालकाला नौकाविहाराचे कंत्राट देण्यात आले. त्याच्यासोबत पाच वर्षांचा करारही केला गेला, तीस हजार रुपये प्रतिमहा जि.प.ला यातून उत्पन्नही मिळणार होते.

पण मध्येच माशी शिंकली. संबंधित कंत्राटदार हा डिफॉल्टर असून त्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी सदस्य कलीम सय्यद यांनी सर्वसाधारण सभेदरम्यान केली. त्यामुळे आता प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया करण्याचे ठरवले आहे, मात्र आता अधिकार्‍यांमध्ये उदासीनता असून प्रकल्प बारगळण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांचा पुढाकार, सदस्यांचा खोडा जि.प.चे तत्कालीन सीईओ अभिजित चौधरी, आताचे सीईओ मधुकरराजे आर्दड आणि पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र आपल्या जिल्ह्यात, जि.प. गटात चांगला प्रकल्प होत असून त्याला पाठबळ देण्याऐवजी काही सदस्य आपल्याला काही मिळाले नाही, म्हणून खोडा घालत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कंत्राट रद्द करण्याचा ठरवा मांडणार्‍या कलीम सय्यद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.

नौकाविहार प्रकल्पासाठी एका रिसोट मालकाची निविदा मंजूर करून डिसेंबरमध्येच प्रकल्प सुरू करण्यात येणार होता, मात्र सर्वसाधारण सभेत सदस्यांनी संबंधित कंत्राटदार डिफॉल्टर असल्याचे सांगत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. आता यासंबंधी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी