Fri, Mar 22, 2019 01:32
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › औरंगाबाद :

औरंगाबाद :‘भाजप अविश्‍वासाबाबत सेना-काँग्रेससोबत नाहीच

Published On: Jan 05 2018 1:34AM | Last Updated: Jan 05 2018 1:34AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मधुकर राजे आर्दड यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव आणण्यासाठी शिवसेना, काँग्रेसह भाजपच्या काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या तीन दिवसांपासून सदस्यांच्या स्वाक्षर्‍यांची मोहीमही सुरू आहे. मात्र, भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा प्रकरणाची हवा काढून घेतली आहे. अविश्‍वास प्रस्तावाबाबत भाजपचे सदस्य कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि काँग्रेससोबत जाणार नाहीत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले आहे.

जि.प.चे सीईओ आर्दड यांच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित करत तीन महिन्यांपूर्वी शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपलेच सदस्य सोबत नसल्याने तो यशस्वी झाला नाही. आता पुन्हा एकदा या संदर्भात हालाचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, यावेळी सत्ताधार्‍यांपेक्षा भाजपचे सदस्यच अधिक आक्रमक होते. सेना-काँग्रेससोबत बैठक करून तुम्ही सर्व सदस्यांच्या स्वाक्षर्‍या घ्या, मग आम्हीही सर्व सदस्य सह्या करू, असे भाजप सदस्यांनी सांगितले.

यावेळी जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनीही सहभाग घेतला. गेल्या दोन दिवसांत सेना-काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षर्‍याही केल्या. आता भाजपची वेळ आहे. मात्र, त्यांना वरिष्ठ नेते परवानगीच देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भाजप सदस्य सेना-काँग्रेससोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाहीत, असे विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा अविश्‍वासाचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सत्तेत, तरी..

राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सीईओ भाजप सदस्यांची किंबहुना जनतेची कामे करत नसल्यास आपल्याच सरकारकडून त्याची बदली करून घेऊ शकतात. मात्र, तसे न करता काही सदस्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सीईओंवर अविश्‍वास प्रस्ताव आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शिवाय सीईओंनी तुमची कोणती कामे केली नाहीत, या वरिष्ठांच्या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांच्याकडे नाही.