Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Aurangabad › औरंगाबाद एमआयडीसीत दगडफेक

औरंगाबाद एमआयडीसीत दगडफेक

Published On: Aug 10 2018 1:25AM | Last Updated: Aug 10 2018 1:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ऐतिहासिक असा प्रतिसाद मिळाला. आंदोलनामुळे गुरुवारी पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अख्खा औरंगाबाद जिल्हा जागच्या जागी थांबला होता. जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या चौकाचौकांत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत बाजारपेठांसह रस्ते रोखून धरले. दुपारपर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या बंदला नंतर वाळूज एमआयडीसीत मात्र हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एमआयडीसीत सुमारे 70 ते 80 छोट्या-मोठ्या कंपन्यांवर दगडफेक करीत, प्रचंड नासधूस केली. याच परिसरात चार ट्रक आणि अग्‍निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. 

पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. सर्वात आधी वाळूज एमआयडीसीत नगर रोडवर असलेल्या बजाज कंपनीसमोर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारासच आंदोलक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांनी आधी रस्त्यावर ठिय्या मांडला. नंतर टायर जाळण्यात आले. सहा वाजण्याच्या सुमारास बजाज कामगारांना घेऊन कंपनीच्या बस येताच आंदोलकांनी या बस रोखल्या आणि कामगारांना आत जाऊ दिले नाही. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंदोलकांचा एक मोठा जमाव एमआयडीसीतील रांजणगावकडून एमआयडीसीत घुसला. या जमावाने कंपन्यांवर दगडफेक सुरू केली. प्रत्येक कंपनीत घुसून हा जमाव दगडफेक, तोडफोड करीत होता. जमावाने एकापाठोपाठ एक अशा छोट्या-मोठ्या सुमारे 70 ते 80 कंपन्यांची प्रचंड नासधूस केली. याच जमावाने रांजणगाव रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ट्रकला आग लावली. ही आग विझविण्यासाठी अग्‍निशमन दलाचा बंब येताच, जमावाने हा बंबही पेटवून दिला. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला.

पोलिस आयुक्‍तांची गाडी फोडली

एमआयडीसीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समजताच पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद मोठा पोलिस फौजफाटा घेऊन तेथे पोहोचले. तेव्हा जमावाने पोलिस आयुक्‍तांच्या वाहनावरही दगडफेक केली. या वाहनाचे बरेच नुकसान झाले आहे. 

दोन पत्रकारांसह एसआरपीचे फौजदार जखमी

वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवरही या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार सुदाम गायकवाड आणि श्याम गायकवाड हे दोघे जखमी झाले. जमावाला रोखण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांनी केलेल्या दगडफेकीत एसआरपीचे फौजदार चिलवंत हेही दगड लागल्याने गंभीर जखमी झाले.

सेनगावात पंचायत समितीचे गोदाम, जीप पेटविली हिंगोली, सेनगाव : प्रतिनिधी

बंदला सेनगाव येथे गुरुवारी हिंसक वळण लागले. अज्ञात आंदोलकांनी गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास तोष्णीवाल महाविद्यालयातील मिनी बस पेटवून दिली. दुपारी साडेबाराच्या सुमारास रस्ता पाहणी करणार्‍या गुत्तेदाराच्या खासगी नोकराची बोलेरो जीप पेटवून दिली. काही अज्ञात आंदोलकांनी साडेचारच्या सुमारास पंचायत समितीच्या गोदामास आग लावल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

सचखंड रोखली, बसेसही बंद

जालना : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर व लाकडे जाळत आंदोलकांनी रास्ता रोको केला. जालना, जाफराबाद, अंबड व परतूर आगारातून एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असल्याने कर्फ्यूसदृश स्थिती पहावयास मिळाली. नांदेड-संचखंड एक्स्प्रेस जालना स्थानकात अडविण्यात आली.

पूर्णा, चुडावात रेल्वेवर दगडफेक

पूर्णा येथील नांदेड गेटवर सकाळी साडेबाराच्या सुमारास तिरुपतीकडे जाणार्‍या एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. काही वेळानंतर पोलिसांना हा जमाव पांगवला. अमरावतीहून तिरुपतीला जाणार्‍या एक्स्प्रेसवर पूर्णा-चुडावा स्थानकांदरम्यान नांदेड गेटवर दगडफेक करण्यात आली, तर चुडावा येथे अदिलाबादहून परळीकडे निघालेल्या पॅसेंजरवर दगडफेक झाली. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.

आमदारास धक्‍काबुक्‍की

पिंपळफाटा येथे रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्‍काबुक्‍की करण्यात आली. यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात गाडीच्या दोन्ही बाजूंच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.