होमपेज › Aurangabad › औरंगाबादच्या सुपुत्राला अखेरची मानवंदना (video)

औरंगाबादच्या सुपुत्राला अखेरची मानवंदना (video)

Published On: Apr 13 2018 3:08PM | Last Updated: Apr 13 2018 3:07PMवैजापूर - प्रतिनिधी 

देशासाठी प्राणाची आहुती देणारे वीर जवान किरण पोपट थोरात यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या राहत्या गावी फकिराबादवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंक्स्‍कार करण्यात आले. किरण यांचे पार्थिव गावात येताच अमर रहे, अमर रहे, शहीद किरण अमर रहे च्या घोषणेने आसमंत दणाणला होता. यावेळी प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते. 

जम्मू काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या गोळीबारीत बुधवारी फकिराबादवाडी येथील जवान किरण थोरात हे जखमी झाले होते. बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर पोहचल्‍यानंतर त्यांना लष्करी दलाने मानवंदना दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी किरण थोरात यांचे पार्थिव त्यांच्या गावी फकिराबादवाडी येथे आणण्यात आले. गुरुवारी सायंकाळपासूनच परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या अंतिम दर्शनाच्या प्रतिक्षेत होते. 

सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव गावात दाखल झाले. गावाच्या वेशीपासून ते त्यांच्या वस्तीपर्यंत तिरंगामध्ये लपेटलेल्या किरण थोरात यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्‍यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळी व देश भक्तीपर घोषवाक्ये लिहून या भारतमातेच्या शूरवीराला निरोप दिला. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. सकाळी ११ वाजेला विधीवत लष्करी इतमामात: त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. लष्करी जवानांकडून तीन फैरी हवेत झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी तसेच लष्करातील अधिका-यांना पुष्पचक्र अर्पण केले. वीर जवान किरण थोरात यांचे अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.