Sun, Jan 20, 2019 06:56होमपेज › Aurangabad › रमजान महिन्याला सुरुवात

रमजान महिन्याला सुरुवात

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 12:15AMऔरंगाबाद : प्र्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्याला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली असल्याने मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पहिला उपवास ठेवला होता. त्यामुळे सायंकाळी उपवास सोडण्यासाठी लागणार्‍या पदार्थांच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. तसेच  बुधवारी रात्रीपासून तरावीहची नमाज पढण्यास सुरुवात झाली आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना हा यंदा कडाक्याच्या उन्हाळ्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी शहरात चंद्रदर्शन न झाल्याने अगोदर शुक्रवारपासून उपवास ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर रात्री उशिरापर्यंत मुस्लिम धर्मगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये मध्यरात्री गुरुवारपासूनच उपवास ठेवण्याचा निर्णय झाल्याने सर्व मशिदींमधून मध्यरात्री तशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी रात्री साडेआठ वाजता होणारी तरावीहची प्रार्थनाही मध्यरात्री केल्यानंतर रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुरुवारी मुस्लिम बांधवांनी पहिला उपवास ठेवला होता. सायंकाळी हा उपवास सुटण्यापूर्वी पासूनच शहागंज, रोषणगेट व मुस्लिम बहुल भागातील बाजारपेठेत नागरिकांनी फळ व इतर पदार्थांची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. 

कुराण पठणास सुरुवात

शहरातील ऐतिहासिक शाही मशिदीत सालाबादप्रमाणे यंदाही जय्यत तयारी करण्यात आली आहे. हाफेज मोहमद जुबैैर, हाफेज मोहमद सलीम, हाफेज मोहमद अनिस दररोज तीन ‘पारे’ पढणार आहेत. रात्री 8.45 वाजता ईशांची नमाज सुरू होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.