Sat, Mar 23, 2019 18:45होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पैसे घेताना पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल; प्राध्यापकाला लुटले

औरंगाबाद : पैसे घेताना पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Published On: May 20 2018 11:51PM | Last Updated: May 20 2018 11:52PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वाहतूक पोलिसांचा वसुलीचा आणखी एक व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. सिडको बसस्थानकाच्या नो पार्किंग झोनमधून जप्त केलेली कार सोडून देण्यासाठी पोलिसांनी एका प्राध्यापकाला अक्षरशः लुटले. सर्व कागदपत्र असताना पोलिसांनी त्यांच्याकडून चारशे रुपये घेतले. विशेष म्हणजे, त्याची पावतीही दिली नाही.

त्याचे झाले असे की, ईटखेडा येथील एक प्राध्यापक आई-वडिलांना सोडण्यासाठी सिडको बसस्थानकावर कार घेऊन आले. एका बाजुला कार उभी करून त्यांना बसमध्ये बसवून देण्यासाठी प्राध्यापक फलाटावर गेले. पाठीमागे वाहतूक पोलिस तेथे आले. त्यांनी क्रेन लावून कार उचलून नेली. अवघ्या दहा मिनिटांत प्राध्यापक कारजवळ आले. मात्र, त्यांना कार दिसली नाही. आजुबाजुला चौकशी केल्यावर पोलिसांनी कार नेल्याचे सांगण्यात आले. सिडको वाहतूक शाखेचे कार्यालय रेणुका माता मंदिराजवळ, जळगाव रोडवर असल्याने प्राध्यापक तिकडे गेले. तेथे कार, एसटी वर्कशॉपजवळील जागेत असल्याचे सांगण्यात आले. प्राध्यापक तेथून पुन्हा मुकुंदवाडी भागात आले.

मित्राला फोन लावूनही केली वसुली

प्राध्यापकाचे वाहतूक शाखेत मित्र आहेत. त्यांनी मित्राला फोन करून कार जप्त केल्याचे सांगत समोरील पोलिसाला बोलण्याची विनंती केली. दोघांचे बोलणे झाल्यानंतरही मित्राचा फोन आला म्हणून पैसे कमी करतो. नसता हजार ते बाराशे रुपये दंड भरावा लागला असता, असे सांगून वाहतूक पोलिसाने ४०० रुपये वसूल केले.

नेमप्लेट ठेवतात झाकून

वाहतूक पोलिसांच्या नेमप्लेटवरील नाव वाचता येत नाही, अशा पद्धतीने ती झाकून ठेवली जाते, असा आरोप सतत होत असतो. पैसे घेणार्‍या या वाहतूक पोलिसाची नेम प्लेटही उलटी पडलेली होती. त्यामुळे त्यांचे नाव स्पष्ट दिसत नाही. 

मार्किंग नसल्याने संभ्रम

वाहन उचलून नेल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी मार्किंग करून ठेवणे गरजेचे असते. त्यावरून वाहन कुठे नेले, हे स्पष्ट होते. मात्र, रविवारी मार्किंग नसल्याने प्राध्यापकाला रेणुकामाता मंदिर ते मुकुंदवाडी असे फिरावे लागले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मार्किंग केले होते, अशी अरेरावी केली.