Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Aurangabad › औरंगाबाद मनपाच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा बळी, उपायुक्‍त निलंबित 

औरंगाबाद: मजुराचा बळी, उपायुक्‍त निलंबित 

Published On: Jun 20 2018 11:04AM | Last Updated: Jun 20 2018 12:06PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एका मजुराचा बळी गेला आहे. भगवान निवृत्‍ती मोरे (वय, ५० रा. मुळ हिंगोली, सध्या रा. जयभवानीनगर, औरंगाबाद) यांचा मनपाने उघडा ठेवलेल्‍या नाल्‍यात पडून मृत्‍यू झाला आहे. या घटनेमुळे मनपा उपायुक्‍त रविंद्र निकम यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी निकम यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. 

मंगळवारी मध्यरात्री शहरात किरकोळ पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील नाल्‍यामध्ये पाणी साठले होते. मोरे हे आपल्‍या पत्‍नीला आणि मुलीला गावी सोडून मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास परत औरंगाबादकडे येत होते. अंधार असल्‍यामुळे त्‍यांना रस्‍त्‍यातील उघडा नाला दिसला नसल्‍यामुळे ते नाल्‍यात पडले. त्‍यांना त्‍यातून बाहेर येता न आल्‍याने नाल्‍यात बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाला.  जय भवानी नगर येथील नाल्‍यात ही घटना घडली. 

महापौरांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृताच्या कुटुंबाला ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्‍यान, प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांतून तिव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.