Tue, Jul 07, 2020 21:08होमपेज › Aurangabad › फेसबुकवरची ‘ती’ पोस्ट पडली महागात

फेसबुकवरची ‘ती’ पोस्ट पडली महागात

Published On: Feb 23 2018 10:12AM | Last Updated: Feb 23 2018 10:12AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

फेसबुकवर लोकप्रतिनिधींबाबत अवमानकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी मनपातील सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सायंकाळी खरवडकर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. मनपा सर्वसाधारण सभेने 15 फेब्रुवारीच ही कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

खरवडकर यांनी 11 फेब्रुवारी रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ‘नालायक लोकांना सभागृह मिळाल्यानंतर ते तत्त्वज्ञानी बनून बेछूट आरोप करतात, यालाच लोकशाही म्हणतात’ असा मजकूर या पोस्टमध्ये होता. त्याआधी मनपाच्या काही सभांमध्ये खरवडकर हे विविध कारणांवरून लक्ष्य ठरले होते. सेना- भाजपच्या काही नगरसेवकांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत कारवाईची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी फेसबुकवर वरील प्रकारची पोस्ट टाकल्याने मनपातील वातावरण तापले होते. त्याचवेळी खरवडकर यांनी ती पोस्ट मनपाशी संबंधित नसून संसदेतील लोकप्रतिनिधींच्या अनुषंगाने असल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले होते.
परिणामी, 15 फेबु्रवारीच्या सर्वसाधारण सभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी खरवडकर यांच्या निलंबनाची मागणी केली. चर्चेअंती महापौर नंदकुमार घोडेले यांनी खरवडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश मनपा प्रशासनाला दिले. त्यानंतर मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सायंकाळी खरवडकर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

काय आहे नोटिशीत

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मनपा आयुक्‍तांनी 12 फेब्रुवारी रोजी खरवडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीचा उल्लेख करून मनपा आयुक्‍त मुगळीकर यांनी म्हटले आहे की, कारणे दाखवा नोटिशीला खरवडकर यांनी उत्तर दिले, परंतु त्यांचा खुलासा असमाधानकारक आहे. यावरून त्यांचे पदास अशोभनीय असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चे नियम 3 (1) चे पोटनियम 3 व 7 चा भंग केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अपमान झाला आहे. म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 (1) अन्वये जयंत खरवडकर यांना निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित करीत आहे.