होमपेज › Aurangabad › मराठी पाट्यांचा प्रश्‍न अद्याप कायम

मराठी पाट्यांचा प्रश्‍न अद्याप कायम

Published On: Feb 27 2018 2:20AM | Last Updated: Feb 27 2018 2:20AMऔरंगाबाद : जे.ई. देशकर

महाराष्ट्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी सर्वच दुकाने, कंपन्या व इतर ठिकाणी मराठीतून पाट्या लावण्याची सक्‍ती सरकारने केली आहे, परंतु नुकताच मराठी पाट्यांबाबत शासनाकडून कायद्यात काहीअंशी बदल केला आहे. बदललेल्या कायद्याच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना न आल्याने दुकाने, कंपनी व इतर ठिकाणच्या पाट्या मराठीत आहेत की इंग्रजीत आहेत याची तपासणी प्रलंबित असल्याची माहिती कामगार उपायुक्‍त शैलेंद्र पोळ यांनी दिली. 

दुकाने, विविध कार्यालये, कंपन्या आदींवर मराठीतून पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. याचे पालन होते किंवा नाही याची पाहणी करून त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी कामगार उपायुक्‍त कार्यालयाकडे सोपवण्यात आली आहे. हे काम कार्यालयाने सुरू केले होते. या कायद्यानुसार अनेकांनी दुकानाच्या, कंपनीच्या पाट्याही बदलून घेतल्या. दरम्यान, सरकारने या कायद्यात बदल करून 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकान, कंपनीला हा कायदा लागू नसल्याचा बदल केला आहे.

कायदा बदलानंतर अशा दुकाने, कंपन्यांवर कोणत्या नियमांनुसार कारवाई करावी, का यातून त्यांना सूट द्यावी याबाबत काहीच मार्गदर्शन न आल्याने या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. बदल झालेल्या कायद्याची मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशीही माहिती पोळ यांनी दिली.