Sat, Apr 20, 2019 16:15होमपेज › Aurangabad › औरंगाबाद एमआयडीसीतील १३ हल्लेखोर इतर समाजाचे!

औरंगाबाद एमआयडीसीतील १३ हल्लेखोर इतर समाजाचे!

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 1:07AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

वाळूज एमआयडीसीतील हल्लाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 36 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील 13 आरोपी हे मराठा नव्हते, इतर समाजाचे आहेत, असे तपासात समोर आले. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित कटच होता, या संशयाला आता अधिकच बळकटी मिळाली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हे आरोपी घुसले कसे?, त्यांना कुणी पाठविले, त्यांचा म्होरक्या कोण? याचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला औरंगाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केले. वाळूज एमआयडीसी भागातही अशाच शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. ओअ‍ॅसीस चौक, कामगार चौकासह विविध ठिकाणी आंदोलक आपल्या भावना प्रकट करीत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू होते. त्यानंतर मात्र अचानक दगडफेक करीत कंपन्यांना टार्गेट करणे सुरू झाले. जमाव आक्रमक झाला. त्यांनी अक्षरशः धुडगूस घालत एकापाठोपाठ गुडईअर, तुषार इंडस्ट्रिज, एफडीसी, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, मार्गनाईट, युरोलाईफ, कोलगेट, जे. के. केमिकल्स, मायलॉन, नहार इंजिनिअरिंग, क्रॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रीव्हज्, एनआरबी बेअरिंग, इंडूरन्स, स्टरलाईट, सिमेन्स, व्हेरॉक, कॅनपॅक, वोक्हार्ट अशा सुमारे 70 ते 80 कंपन्यांवर हल्ले केले. त्यामुळे पोलिसांसह सर्वांचीच धावपळ झाली. शांततेत सुरू असलेले आंदोलन अचानक कसे चिघळले? याचा पोलिसांनाही अद्याप नेमका अंदाज बांधता आला नाही. दरम्यान, पोलिस बंदोबस्त वाढविणे, त्यांनी जमावाला नियंत्रणात आणणे यासाठी बराच अवधी लागला. त्यामुळे सायंकाळपर्यंत ही तोडफोड सुरूच होती. यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याचा उद्योग जगताने मोठा धसका घेतला असून त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आधीपासूनच व्यक्‍तहोत होता संशय

मराठा आंदोलनाचा काही समाजकंटकांकडून गैरवापर होऊ शकतो. आंदोलनात घुसून ते हिंसक कृत्य करू शकतात, अशी शक्यता मराठा क्रांती मोर्चाने आधीच व्यक्‍त केली होती. गृहविभागालाही तशी शंका आधीपासूनच वाटत होती. पुण्यातील चाकण येथील आंदोलनात तसेच घडले होते. आता वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवरील हल्ल्यात इतर समाजाचे 13 आरोपी सापडल्याने या आंदोलनाचा समाजकंटक खरोखरच गैरवापर करू लागल्याचे हळूहळू समोर येऊ लागले आहे. 

दगडफेक, तोडफोड करणेच उद्देश?

दरम्यान, सात वेगवेगळे पथक स्थापन करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांनी दोन दिवसांत वेगवेगळ्या 28 कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर 36 आरोपींना अटक केली. पकडले गेलेले आरोपी कोण आहेत, त्यांचा आंदोलनात सहभागी होण्याचा उद्देश काय? आणि ते खरोखर आंदोलक आहेत का? याचा पोलिस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी अटकेतील आरोपी कोणत्या जातीचे आहेत याचीही नोंद घेतली असून 36 पैकी 13 जण वेगवेगळ्या समाजाचे असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांचा या आंदोलनात येण्याचा उद्देश काय? ही माहिती पोलिस गोळा करीत असून ते दगडफेक, तोडफोड करण्यासाठीच आले होते, अशी शंका पोलिसांना आहे.