होमपेज › Aurangabad › दहावी परीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात पहिला

दहावी परीक्षेत औरंगाबाद विभाग राज्यात पहिला

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 30 2018 12:50AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 17 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात औरंगाबाद विभाग राज्यात पहिला आहे. विभागाचा एकूण निकाल 32.83 टक्के इतका लागला आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च- एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात येते. या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, त्वरित त्यांची परीक्षा घ्यावी, त्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची संधी मिळावी, असा शासन निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानुसार  चार वर्षांपासून त्वरित पुरवणी परीक्षा घेण्यात येते. बुधवारी लागलेल्या निकालात राज्याचा एकूण निकाल 23.66 टक्के लागला आहे. जो मागील वर्षीच्या तुलनेत कमी लागला आहे. राज्यातून या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 22 हजार 17 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 21 हजार 59 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 28 हजार 645 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद विभागातून या परीक्षेसाठी 13 हजार 143 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 हजार 959 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 4 हजार 255 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा एकूण निकाल 32.83 टक्के लागला असून विभाग राज्यात प्रथम स्थानावर आहे.  विभागातून 2 हजार 985 मुले तर 1 हजार 506 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणपत्रक लवकरच तारीख जाहीर करून देण्यात येईल, अशी माहिती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

गुण पडताळणी मुदत 8 सप्टेंबर

ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे. त्यांनी 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे गुणपडताळणी अर्ज करायचे आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करायची आहे. त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात, विहित शुल्कासह 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करायचे आहे.